सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एकीकडे एआयएमआयएमचे नेते खासदार असदोद्दीन ओवैसी व त्यांचे बंधू अकरोबद्दीन ओवैसी यांच्या आक्रमक शैलीतील जाहीर सभा होत असताना दुसरीकडे प्रत्युत्तरादाखल शिवसेनेकडून कर्नाटकातील श्रीराम सेनेचे वादग्रस्त नेते प्रमोद मुतालिक यांच्या तेवढय़ाच आक्रमक पद्धतीच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सभा झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातून सामाजिक ध्रुवीकरणाने कमालीचा वेग घेतला असून त्याचा राजकीय लाभ शिवसेनेला होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिंदे यांचेच कालपर्यंत निष्ठावंत सहकारी समजले जाणारे विष्णुपंत कोठे यांचे पुत्र महेश कोठे तसेच माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. कोठे यांचे शिष्य समजले जाणारे तौफिक शेख यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे काँग्रेसची साथ सोडून एमआयएममध्ये प्रवेश करीत तेथून उमेदवारी आणली आहे. शेख यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते खासदार असदोद्दीन ओवैसी व अकबरोद्दीन ओवैसी या दोघा बंधूंच्या जाहीर सभा होम मैदानावर झाल्या. या दोन्ही सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. ओवैसी बंधूंनी अल्पसंख्याक समाजाबरोबर धनगर व दलित समाजाच्या मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. एमआयएममुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढत असताना त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचे दिसून येते. एमएमआयची उमेदवारी ही शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेच्या प्रचारातून काँग्रेसला गौण लेखून एमआयएम संघटनेला वाढत असलेल्या प्रतिसादाबद्दल हिंदू मतदारांना जागे करण्याचा प्रयत्न होत आहे. एमआयएमचा उमेदवार एकगठ्ठा मते घेऊन आघाडीवर असल्याने हिंदूंनीही सावध राहावे, हाच सेनेच्या प्रचाराचा मुद्दा असताना त्यात भर म्हणून कर्नाटकातील श्रीराम सेनेचे जहाल नेते प्रमोद मुतालिक यांना शिवसेनेने पाचारण केले. मुतालिक यांनी मतदारसंघात प्रचार सभा घेऊन एमआयएमला रोखण्यासाठी कट्टर हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार
केला.
ओवैसी बंधू व मुतालिक या दोघांमुळे सामाजिक ध्रुवीकरण होत असून त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. या मतदारसंघात भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की यांची उमेदवारी आहे. परंतु शिवसेनेच्या तुलनेत त्यांची शक्ती कमी पडत असल्याचे बोलले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2014 रोजी प्रकाशित
शिवसेनेच्या मदतीला श्रीराम सेना
शिवसेनेकडून कर्नाटकातील श्रीराम सेनेचे वादग्रस्त नेते प्रमोद मुतालिक यांच्या तेवढय़ाच आक्रमक पद्धतीच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सभा झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

First published on: 12-10-2014 at 04:14 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri ram sena supports shiv sena in solapur