विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिथी कक्षामध्ये रिव्हर्स क्लॉक लावण्यात आले आहे. या क्लॉकद्वारे ऐतिहासिक गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याची माहिती  विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांनी दिली.
 गोसीखुर्द प्रकल्पाची प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी २५३ दिवसांचा अवधी निश्चित करण्यात आला असून ही कामे २० सप्टेंबर २०१३ ते ३१ मे २०१४ या काळात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसात होणारे विकास काम गृहीत धरून उद्दिष्ट कमी होणार आहे. यावरून किती दिवस राहिले आणि किती कामे बाकी आहेत, याचा अंदाज येणे शक्य होईल. या कामात बुडित क्षेत्रातील शेतीचे नुकसान आणि त्यांच्या भरपाईचा मोबदला, शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची कामे, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची कामे उद्दिष्टपूर्तीनुसार करण्यात येणार आहेत. ठरलेल्या दिवसानुसार एक एक दिवस कमी होऊन कामे पूर्ण झाल्यावर रिव्हर्स क्लॉक शून्य असा आकडा दाखवेल. याशिवाय प्रकल्पाची कामे प्रलंबित असल्यास त्याकरिता अपेक्षित दिवसांचे उद्दिष्ट रिव्हर्स क्लॉकमध्ये नमूद करून ती प्रलंबित असलेली कामे वेगाने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
नवी दिल्लीतील मेट्रोच्या कामामध्ये रिव्हर्स क्लॉकचा उपयोग झाला होता. ती कामे उद्दिष्टानुसार पूर्ण झाल्यामुळे ही प्रणाली रिव्हर्स क्लॉकच्या माध्यमातून अतिथी कक्षात लावण्यात आली आहे. नागपूर येथील पद्मभूषण ई. श्रीधरन या रिव्हर्स क्लॉकचे संशोधक आहेत. या रिव्हर्स क्लॉकचा उपयोग प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ही प्रणाली उपयोगात आणावी, असे आवाहन उपायुक्त एस.जी. गौतम यांनी केले.