मुद्गल बंधाऱ्यातून परळी औष्णिक केंद्राला पाणीपुरवठा केला, ती पद्धत चुकीची होती. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना बंधाऱ्याचे दरवाजे उघडणार आहोत, याची कल्पना न देताच अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाने काम केले. ज्या तत्परतेने सोमवारी शिवसैनिकांवर लाठीहल्ला झाला, तीच तत्परता शिवसैनिकांचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नात दाखवली असती तर आजची धुमश्चक्री झाली नसती, असे मत आमदार संजय जाधव यांनी व्यक्त केले. तर पालकमंत्री प्रकाश सोळुंके आकसबुद्धीने लोकप्रतिनिधींना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप आमदार मीरा रेंगे यांनी केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय व बी. रघुनाथ सभागृहातील तोडफोड अतिशय गंभीर असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी स्पष्ट केले. परळी औष्णिक केंद्राला पाणी सोडताना शिवसैनिकांच्या जिवाची पर्वा केली नाही, असा आरोप करीत आमदार रेंगे व जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी काढलेल्या मोर्चामुळे परभणीत खळबळ उडाली. शिवसेनेच्या या गोंधळामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या दोन्ही आमदारांनी केली. परंतु बैठक न झाल्यास पुढील वर्षी जिल्हा विकास निधी मिळण्यास अडचण होईल, असे सांगितले आणि बैठकीचे कामकाज सुरू केले. त्यांनी पंधरा मिनिटांतच नियोजन समितीची बैठक गुंडाळली.
तत्पूर्वी बी. रघुनाथ सभागृहात पालकमंत्र्यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. तेथून ते बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सभागृहातील ध्वनिक्षेपक काढून फेकले व खुच्र्याची मोडतोड केली. या वेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत सखुबाई लटपटे, बळीराम नवघरे, महादू जोतिबा भुजबळ, हरिचंद्र बळीराम सावंत, मोहन सखाराम उबाळे, बापुराव रामभाऊ पुरकाने यांच्यासह पोलीस मुख्यालयातून कर्मचारी शेख शहाबाज, एस. के. गडगिळे, एन. बी. वानरे, सी. आर. पठाण, एस. एन. आरगडे, एस. बी. कोलमवार जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पालकमंत्री सोळुंके यांच्या बीड जिल्ह्य़ातील नागापूर धरण औष्णिक वीज केंद्रापासून जवळ असतानाही परभणी जिल्ह्य़ातील पाणी नेण्याचा खटाटोप कशासाठी केला जात आहे, असा सवालही आमदार रेंगे यांनी उपस्थित केला.