गोंदिया शहरातील सुभाष बागेतील समस्या व प्रभाग क्र. ६ च्या विविध समस्यांसाठी भाजपच्या नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुभाष उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील एकमात्र असलेल्या सुभाष उद्यानाच्या दुर्दशेला जबाबदार नगर परिषद आहे. बगीच्याच्या सौंदर्यीकरणासाठी वेळोवेळी आमसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला, मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे. या उद्यानात मेहंदी, अशोकाचे झाड लावून लॉनमधील गवताची कापणी करणे, बगीच्यातील कारंजे सुरू करणे, बालकांची खेळणी दुरुस्ती करणे, तरुणांसाठी असलेल्या व्यायामशाळेत साहित्य आणणे, बगीच्यात लावलेले झुमर व शो लाईट सुरू करणे, बागेत सुविचारांचे फलक लावणे, बगीच्यात महिला-पुरुषांसाठी शौचालय व मूत्रीघराची व्यवस्था करणे, बागेतील सर्व मूर्तीची रंगरंगोटी करणे, बागेतील ग्रील, सुरक्षा िभत व कार्यालयाला रंगरंगोटी करणे, सिमेंट बाकांना रंगरंगोटी करणे, सिमेंट शीट, लाईट व्यवस्था, योग्य पद्धतीने करणे, भजन ऐकण्यासाठी साऊंड सिस्टम सुरू करणे, बागेच्या देखरेखीसाठी स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तहसील कार्यालयाच्या बाजूकडील गेट बंद करण्यात यावे, तसेच प्रभाग क्र. ६ इंगळे चौकातील बोडीचे काम तीन वर्षांपासून बंद असल्याने यापूर्वी शासनाने मंजूर केलेल्या लाखो रुपयाचा हिशेब देण्यात यावा, बोडीचे खोलीकरण करण्यात यावे, या मागण्यांसाठी २६ एप्रिलला सकाळी ९ वाजतापासून एक दिवसाचे सांकेतिक उपोषण नगरसेविका भावना कदम, नगरसेवक राहुल यादव, नगरसेविका सुनीता हेमणे व माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे करणार आहेत. १५ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे.