गणेशोत्सवादरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातील तरुणांनी एकत्र येत निर्माल्य संकलन आणि पुनर्वापराचे विविध उपक्रम सुरूकेले आहेत. त्यामुळे विसर्जनस्थळी पाण्यात फेकल्या जाणाऱ्या निर्माल्याचा वापर आता गांडूळ खत तयार करण्यासाठी होऊ लागला आहे. गांडूळ खत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे वितरणही हे तरुण करीत आहेत.
कल्याण पूर्व विभागातील अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या काही युवकांनी क्षितिज ग्रुपची स्थापना करत निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प हाती घेतला. यंदा त्यांच्या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून परिसरातील चार तलावांच्या काठी उभे राहून या संस्थेचे कार्यकर्ते निर्माल्याचे संकलन करणार आहेत. चिंचपाडा खदाण, तिसाई मंदिराजवळील तलाव, विठ्ठलवाडी परिसरातील तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी क्षितिज ग्रुपचे युवक निर्माल्य संकलन करणार असून लोकग्राम परिसरामध्ये या युवकांचा गांडुळ खतनिर्मिती प्रकल्प आहे.
पूर्वी तलावातील निर्माल्यापासून निर्माण होणारा गाळ हा महापालिकेच्या वतीने काढून तो तलावाच्या काठीच टाकला जायचा तर कधी तो क्षेपणभूमीवर टाकला जायचा. त्यामुळे लोकांच्या भावनांचा अनादार होत असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केला. क्षितिज ग्रुपचा अझर शेख हा तरुण मुंबई महापालिका आणि स्थानिक शाळांच्या मदतीने हा उपक्रम विक्रोळीमध्येही राबवीत असल्याची माहिती क्षितिज ग्रुपचा मयूर दिघे याने वृत्तान्तशी बोलताना दिली.
ठाण्यातील समर्थ व्यासपीठच्या वतीनेही अशाच प्रकारचा निर्माल्य व्यवस्थापनाचा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यातील कळवा गणेशघाट परिसरामध्ये राबविण्यात येत असून येथे फुलांचे जैविक पद्धतीने विघटन करून त्याच्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता नवरात्रोत्सवामध्येही हा प्रकल्प सुरू असतो. गणेशघाटावर गणपती आल्यावर तिथे निर्माल्य काढून घेतले जाते. त्यातील अविघटनशील घटक म्हणजे अगरबत्त्यांची पाकिटे, प्रसादाचे बॉक्स, देवतांच्या तसबिरी असे घटक वेगळे केले जातात. त्यानंतर जमा झालेल्या या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर केले जाते. मासुंदा, रायलादेवी, कळवा गणेशघाट, रेतीबंदर या भागामध्ये २०१२ मध्ये २०० टन निर्माल्याचे संकलन या संस्थेने केले होते. शिवाय त्याचे खतनिर्मिती झाल्यानंतर त्याचे वितरणही करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सध्या हा उपक्रम राबविला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
निर्माल्याच्या पुनर्वापराची चळवळ!
गणेशोत्सवादरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातील तरुणांनी एकत्र येत निर्माल्य संकलन

First published on: 11-09-2013 at 08:37 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement of reuse of waste in ganesha festival