शहरातील ४ तरुणांकडून ४ रिव्हॉल्व्हर जप्त केल्यानंतर खडबडून जागे होत वजिराबाद पोलिसांनी गुरुवारी एका प्रकरणात या तरुणांना रिव्हॉल्व्हर पुरवठा करणाऱ्या करणसिंग रतनसिंग चौहाण (१८) याला वसमत येथून अटक केली. पंजाब पोलिसांच्या कारवाईनंतर नांदेड पोलिसांनी शहरात काही संशयितांची एकाच दिवशी झडती घेतली.
पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे, तसेच निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ तास ५०पेक्षा अधिक तरुणांची झडती घेतल्यानंतर भगिदरसिंग गुरुसागर सुखमनी (२६), राजेंद्रसिंग नरेंद्रसिंग पुजारी (२९), मनप्रितसिंग गोिवदसिंग कुंजीवाले (२३) व देवेंद्रसिंग बाबुसिंग रागी (३१) या चौघांकडे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे सापडली. चार रिव्हॉल्व्हर सापडल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. पुजारी नुकताच गुरुद्वारा बोर्डाच्या संचालक मंडळावर निवडून आला. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यांना गुरुवापर्यंत पोलीस कोठडी दिली होती. गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी या प्रकरणी तपासावर लक्ष केंद्रित करून रिव्हॉल्व्हर पुरवठा करणाऱ्या करणसिंग रतनसिंग चौहाण याला अटक केली. करणसिंग वसमतचा रहिवासी असून तो वसमतच्याच विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
दरम्यान, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन-तीन टोळ्या कार्यरत आहेत. स्वतचे वर्चस्व कायम राहावे, या साठी त्यांच्यात अनेकदा हाणामाऱ्याही झाल्या. एक गट सध्या मोक्का कायद्यान्वये न्यायालयीन कोठडीत आहे. कारागृहाबाहेर आल्यावर हा गट आपल्यावर हल्ला करील, अशी शक्यता गृहीत धरून या चौघांनी जवळ शस्त्र बाळगल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. करणसिंग याच्या जबाबावरून पोलिसांनी आता अकोल्याच्या ‘त्या’ व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, न्यायालयाने करणसिंगला २१ पर्यंत पोलीस कोठडी, तर उर्वरित चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.