महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित झाल्यानंतर उद्या, शनिवारी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सर्व शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत. दहावी-बारावीचे निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आल्यानंतर सात किंवा आठ दिवसानंतर शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमधून गुणपत्रिका करण्याचे धोरण राबविले जाते. मूळ गुणपत्रिका जोडल्याशिवाय महाविद्यालयात अर्ज देता येणार नाही शिवाय ज्यांना फेरगुणमूल्यांकन करायचे आहे त्यांनाही मूळ गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्या शिक्षण मंडळात फेर मूल्यांकनाचे अर्ज स्वीकारले जाणार आहे.
गेल्या  ७ जूनला ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला होता. उद्या, सर्व शाळांमधून दुपारी १ वाजेनंतर गुणपत्रिका देण्यात येईल. केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार यावर्षी प्रवेश होणार असल्यामुळे ठरवून दिलेल्या संकलन केंद्रावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शिक्षण मंडळात सकाळी ११ वाजेपासून सारांश पुस्तिका व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप होणार असून संबंधित शाळेतील कर्मचाऱ्यांनी किंवा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनिशी असलेले पत्र आणल्यानंतर मंडळातून निकाल पुस्तिका घेऊन जावी, असे आवाहन नागपूर विभागीय  शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांनी केले आहे.