व्यक्तीचे जीवन अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाची माहिती शिक्षकांना दिल्यास वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होऊ शकेल, असे मत नागपूर-अमरावती विभागाचे प्रभारी माहिती संचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून ३ ते १७ जानेवारी या कालावधीत पंचविसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. वाहतुकीच्या नियमाची माहिती देण्यासाठी व जनजागृतीसाठी या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राठोड बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाचे जीवन वाहन चालकाच्या हातात असल्याने वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमाच्या जाणीव जागृतीचे काम हे केवळ परिवहन कार्यालयाचेच नसून ते प्रत्येक विभागाचे आणि व्यक्तीचे असल्याचेही राठोड यावेळी म्हणाले. सर्जेराव शेळके यांनी प्रास्ताविकातून रस्ता सुरक्षा अभियानात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कालावधीत वाहन चालकासाठी प्रबोधनात्मक कार्यशाळा, महामार्गावर मोठय़ा वाहनांवर रिप्लेक्टर लावणे, मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर परवाना प्राप्त करण्यासाठी जनजागृती, मोटार अपघात दाव्याच्या माहिती व मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, वाहनचालकांसाठी वैद्यकीय तसेच आरोग्य तपासणी शिबीर, भिंतीपत्रक लावणे, रक्तदान शिबीर, विशेष वाहन तपासणी मोहीम आदी उपक्रम राबवण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.
याप्रसंगी निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप व वाहन चालकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. विजय चव्हाण यांनी आभार मानले.