नवी मुंबईकरांना आता रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, टोल फ्री क्रमांक आणि संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डय़ांनी वाहन चालक, प्रवाशी, नागरिक हैराण झाले आहेत. त्याची दुरुस्ती होत नसल्याबद्दल त्यांची प्रचंड नाराजी आहे.  या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबिले आहे. खड्डेविरहित रस्ते संकल्पना ही प्रत्यक्षात आणण्यासाठी पालिकेच्या वतीने चार प्रकारच्या तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आल्या आहेत.  भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, टोल फ्री क्रमांक आणि संकेतस्थळाची अशा प्रणालींचा यात समावेश आहे. रस्त्याविषयी असलेल्या तक्रारी महानगरपालिकेकडे सहजपणे पोहचवता याव्यात यासाठी पालिकेच्या आठही विभाग कार्यालयांत तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे.  १८००२२२३०९ व १८००२२२३१० असे दोन टोल फ्री क्रमांक, ८४२४९४९८८८ हा भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्ांकेतस्थळावर तक्रार निवारण संगणक प्राणालीमध्येही नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तक्रार ऑनलाइन नोंद केल्यानंतर तक्रारदारास संगणकीय तक्रार क्रमांक देण्यात येईल. या तक्रार क्रमांकानुसार करण्यात आलेल्या तक्रारीच्या निवारणाची माहिती नागरिक ऑनलाइन पाहू शकतात. तसेच  ८४२४९४९८८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे  तक्रार नोंदवू शकतात तसेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे छायाचित्रही पाठवू शकतात. नागरिकांना पालिकेच्या या सुविधांचा लाभ घेऊन तक्रार नोंदवावी,असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.