शिवछत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे, असे म्हणणारे अनेक शिवभक्त आपल्याकडे असले तरी महाराजांसारखे राष्ट्रीयत्व जोपासणारे दिसून येत नाही. परकीय शक्ती आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करीत आहे. पण आपण शांत बसलो असून ते येणाऱ्या काळात घातक आहे. त्यामुळे या देशातील हिदुत्व शक्तींनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन संभाजी भिडे यांनी केले.
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि तेजस्विनी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बापुसाहेब महाशब्दे स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. मुंजे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला अमर महाशब्दे, अनिल वरखेडे, हेमंत मानमोडे आदी उपस्थित होते.
राज्यात शिवशाही, शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आणि त्यांच्याबद्दल आदर करणारे अनेक असले तरी राष्ट्रीयत्वाची भावना असणारे हिंदुत्ववादी नाही. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे अजून कळले नाही आणि हे ज्याला कळत नाही ते राष्ट्र म्हणजे हिंदुस्थान आहे. आपण या राष्ट्रीयत्वाचा विचार करणार आहोत की नाही. संसदेवर हल्ला होतो, त्यात नेत्यांना वाचविण्यासाठी जवान बलिदान देतात तरीही आपले रक्त सळसळत नाही. मुळात हिंदूंना राष्ट्रीयत्व कळले नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची किंमत आपल्याला कळली पाहिजे, असेही भिडे म्हणाले