News Flash

डिंको सिंग

पूवरेत्तर राज्यातील डिंकोने खडतर परिश्रम, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या बळावर बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवला.

डिंको सिंग

डिंको सिंगच्या खात्यावर ऑलिम्पिक पदक नाही, परंतु तरीही त्याला बॉक्सिंग खेळात महानायकाप्रमाणे स्थान होते. पूवरेत्तर राज्यातील डिंकोने खडतर परिश्रम, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या बळावर बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवला. खेळातील निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून वाटचाल चालू असतानाच कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारामुळे काळाने त्याला हिरावून नेले. तो गेला तेव्हा त्याचे वय होते अवघे ४२ वर्षे. यातील चार वर्षे तर कर्करोगाशी झुंजण्यातच गेली. गतवर्षी करोना आणि कावीळ या आजारांनीही त्याला पोखरले. मणिपूरची राजधानी इम्फाळच्या पूर्वेकडील सेक्ता या दुर्गम गावातील गरीब कुटुंबात १ जानेवारी १९७९ रोजी जन्मलेला डिंको, आधारगृहातच लहानाचा मोठा झाला. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने राबवलेल्या ‘विशेष भागांतील क्रीडा योजने’त डिंकोमधील उपजत गुणवत्ता हेरण्यात आली. १९८९मध्ये वयाच्या १०व्या वर्षी अंबाला येथे झालेल्या उपकनिष्ठ बॉक्सिंग स्पध्रेत त्याने प्रथम राष्ट्रीय विजेतेपद मिळवून निवड समिती सदस्य आणि प्रशिक्षकांचे डिंकोमधील प्रतिभेने लक्ष वेधले. येथूनच त्याच्या बॉक्सिंगमधील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १९९७मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग िरगणात पदार्पण केले. याच वर्षी बँकॉकला झालेल्या किंग्ज चषक स्पध्रेत डिंकोने विजेतेपदासह सर्वोत्तम बॉक्सिंगपटूचा किताब जिंकला. १९९८मधील बँकॉकच्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी डिंकोची सुरुवातीला भारतीय संघात निवड झाली होती. परंतु काही कारणास्तव त्याला वगळण्यात आले. पण आत्महत्येची धमकी दिल्यामुळे त्याची संघात पुन्हा वर्णी लागली. मग ५४ किलो वजनी गटात डिंकोने सोनताया वाँगप्रेट्स (थायलंड) आणि तिमूर तुल्याकोव्ह (उझबेकिस्तान) या ऑलिम्पिक विजेत्यांना अस्मान दाखवत आपली निवड सार्थ ठरवताना सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. १६ वर्षांनी भारताला मिळालेले हे आशियाई सुवर्णपदक ऐतिहासिक ठरले. त्यामुळे १९९८मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’ आणि २०१३मध्ये ‘पद्मश्री’ने त्याला गौरवण्यात आले. २०००च्या ऑलिम्पिक स्पध्रेतही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. परंतु उपउपांत्यपूर्व फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले. सेनादलात कार्यरत असलेल्या डिंकोने निवृत्तीनंतर बॉक्सिंगपटू घडवण्याचा ध्यास जपत इम्फाळच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. परंतु आजारपणाने त्याच्या वाटचालीत अडथळा निर्माण केला.

डिंकोचे यश ईशान्येकडील राज्यांतील मेरी कोम,  एम सुरंजॉय सिंग, एल देवेंद्रो सिंग, एल सरिता देवी अशा  अनेकांना  बॉक्सिंगसाठी प्रेरणादायी ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 1:26 am

Web Title: article about boxer dingko singh zws 70
Next Stories
1 बुद्धदेव दासगुप्ता
2 प्रा. विश्वनाथ सोलापूरकर
3 एम. एस. नरसिंहन
Just Now!
X