अर्चना मुळे
कालपासूनच वैशालीचा मूड ऑफ होता. ते बघून तिची आई वैतागली होती. तिची स्पेस देऊनही तिचा मूड बदलला नव्हता. काल वैशालीचं एक पार्सल कुरिअरने घरी आलं होतं. तेंव्हापासून तिचं काहीतरी बिनसलं होतं. तिला होणारा मानसिक त्रास बघून आईने वैशालीला जवळ घेतलं. तशी ती रडायला लागली. तिचं रडणं बघून तिचा भाऊही रुममधून बाहेर आला. तशी वैशाली ओरडली, “याच्यामुळे झालंय हे सगळं.”
“अगं… मी काय केलं?”
“ तूच नाही का माझ्यासाठी एक टाॅप आणि तुझ्यासाठी एक शर्ट ऑर्डर केला होतास.”
“ मग…?”
“ अरे..तू माझ्यासाठी जो टाॅप ऑर्डर केला होतास तो आलाच नाही. वेगळाच आलाय. तुझा शर्ट मात्र तुला हवा तोच आला आहे. माझाच टाॅप वेगळा आहे. आणि त्याचे पैसेही जास्त आहेत. ॲडिशनल चार्जेस द्यावे लागले मला.”
“ अगं पण, यात माझी काय चूक? आणि असं कसं झालं? थांब मी बघतो.”
तिच्या भावाने ते पार्सल बघितलं. त्यालाही आश्चर्य वाटलं. पण आता रडून किंवा आरडाओरडा, चिडचिड करुन उपयोग नव्हता. त्याला काय करायचं कळेना. तो तिला फक्त साॅरी म्हणाला. खरंतर दोघांनी मिळून कपडे ऑनलाइन ऑर्डर केले होते. त्याला वाटलं की, दुकानातून शाॅपिंग केलं असतं तर बरं झालं असतं. आता काय करणार? तो कंपनीच्या वेबसाईटवर गेला, पण तिथे तक्रार करण्यासाठीचा पर्याय नव्हता. कंपनीचा मेल आयडी नव्हता. जो पत्ता होता त्यावर पत्रव्यवहार करायचा असं त्याने ठरवलं. पण ते मागे पडलं. तो ते विसरूनही गेला.
हेही वाचा… शिल्पाच्या ‘ऋषीच्या भाजी’च्या ‘वरातीमागून घोड्या’ची गोष्ट!
असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस वैशालीने गुगलवर शाॅपिंग संदर्भात काही शोध घेत असताना ‘डार्क पॅटर्न’ असं वाचलं. तिला उत्सुकता वाटली. तिने परत परत वेगवेगळ्या वेबसाईटवर त्या बाबतची माहिती वाचली. कारण त्यात ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची होणारी फसवणूक याबद्दल लिहिलं होतं. तिने भावाला हाक मारली दोघांनी मिळून ती पुन्हा वाचली. त्यातील मुद्दे समजून घेतले.
जेव्हा आपण एखाद्या सोशल मीडियाचे युजर असतो. तेव्हा कुठलंतरी ॲप पाॅप अप होतं. त्यावर आकर्षक पध्दतीच्या वस्तू विक्रीसाठी दाखवल्या जातात. त्यावर सहजच काहीवेळा नेत्रसुखासाठी क्लिक केलं जातं. ॲप विचारतं, “ तुम्हाला हे ॲप आणखीन वापरायला आवडेल का?” त्याचवेळी सेटिंगमधे पर्सनॅलाइज्ड असा ऑप्शन येतो. आपण इथेही क्लिक करतो. इथून सुरू होते आपली फसवणूक. यानंतर सतत आपल्या मेल्सवर,आपल्या कोणत्याही सोशल प्लॅटफाॅर्मवर या कंपनीच्या जाहिराती येऊ लागतात.
काही कंपन्यांच्या कुकीज ॲक्सेप्ट केल्याशिवाय त्यांच्या वेबसाईटवर जाता येत नाही. काही कंपन्या सबस्क्रिप्शन घ्यायला लावतात, पण अनसबस्क्राईब करण्याचा ऑप्शन सहज सापडत नाही.
ऑनलाइन खरेदीमधे होणारी फसवणूक ही नऊ पध्दतीने केली जाते. या पध्दती ‘डार्क पॅटर्न’ मधे येतात.
१) अर्जन्सी – कमी प्राॅडक्ट शिल्लक आहे असं सांगण्यासाठी आणि खरेदीसाठी सतत पाॅप अप देणं.
२) बास्केट स्निकिंग – ग्राहकांना न सांगता जास्तीचं एखादं प्राॅडक्ट पाठवणं.
३) कन्फर्म शेमिंग – वेबसाईट /ॲप मधून सहज बाहेर पडता येत नाही.
४) फोर्स्ड ॲक्शन – एखादं प्राॅडक्ट खरेदी केल्याशिवाय वेबसाईटवर जाता येत नाही.
५) नॅगिंग – प्राॅडक्ट खरेदीची आठवण करून देण्यासाठी सतत जाहिराती पाठवणं.
६) इंटरफेस इंटरफिअरन्स – सिलेक्टेड वस्तूशिवाय दुसरीच वस्तू पाठवणं.
७) बेट अँड स्वीच – मागवलेली वस्तू संपली असं सांगून दुसरी महागडी वस्तू पाठवणं.
८) हिडन काॅस्ट – छुपे दर लावणं.
९) डिस्गस्ड ॲड्स – भ्रामक जाहिराती दाखवणं.
वैशालीला आपली फसवणूक झाल्याची जाणीव आधीच झाली होती. या माहितीने तिला आधार मिळाला. अशा फसव्या कंपन्या आहेत आणि ते बेमालूमपणे फसवत असतात. तिने वाचलं की, भारतात लोकप्रिय अशा ७५ इ काॅमर्स कंपन्या आहेत. त्यापैकी बहुसंख्य कंपन्या एक तरी ‘डार्क पॅटर्न’ वापरून ग्राहकांची फसवणूक करतात. अशा घटनांबाबत ‘नॅशनल कंज्युमर हेल्पलाईन नंबर १९१५’ वर संपर्क साधून रिपोर्ट करू शकतो. शिवाय ८८००००१९१५ या क्रमांकावर वाॅट्सअपच्या माध्यमातूनही अशा सेल्स कंपन्यांविरोधात तक्रार नोंदवू शकतो.
हेही वाचा… एकल माता आणि अपत्यांचा जन्म दाखला!
इतकी सगळी माहिती मिळाल्यावर वैशालीने व्हॉट्सअपचा नंबर सेव्ह केला. त्या नंबरवर तिच्या बाबतीत जे घडलं ते सगळं जसंच्या तसं लिहिलं. तिने त्यांना विचारलं, मला कसा न्याय मिळेल?. तिकडून रिप्लाय आला. केलेली ऑर्डर, आलेलं प्राडक्ट, पैसे भरल्याचं गुगल पे रिसिट सगळ्याचे फोटो वाॅट्सअपवर पाठवा. अर्थात जेंव्हा तिने ‘डार्क पॅटर्न’ बद्दल वाचलं तेंव्हा तिच्याकडे रिसिट नव्हती. जेंव्हा तिला ड्रेस मिळाला होता तेंव्हा मुड ऑफ झाल्याने रागाच्या भरात तिने ते ॲप रिमूव्ह केलं होतं. त्यामुळे तिला तक्रार अशी नोंदवता आली नाही. परंतु पुन्हा काहीही ऑनलाइन शाॅपिंग करताना वैशाली आणि तिचे कुटुंबिय काळजी नक्कीच घेतील. आपणही घेऊया.
‘डार्क पॅटर्न’मुळे आपलं भावनिक आणि आर्थिक शोषण होतं. ऑनलाइन शाॅपिंग बाबत होणाऱ्या फसवणुकी संदर्भातील डार्क पॅटर्न नीट समजून घ्यायला हवं. त्याबद्दल जागरूक व्हायला हवं. नाहीतर ऑनलाइन शाॅपिंगमधे ग्राहक हा भगवान होत नाही, तर तो बळीचा बकरा होतो.
समुपदेशक, सांगली.
archanamulay5@gmail.com