कांद्याबरोबरच टोमॅटोनेही दरांमध्ये अधिक भाव खाल्ल्याचा परिणाम ऑक्टोबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर झाला आहे. या कालावधीत महागाईचा दर ७ टक्क्यांवर पोहोचतानाच गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत सर्वोच्च टप्प्यावर स्थिरावला आहे. तर चालू आर्थिक वर्षांतील त्याची ही विक्रमी वाढ आहे.
घाऊक किंमत निर्देशांकात एकूणच अन्नधान्याच्या महागाईने १८ टक्के वाढ नोंदविली आहे. ऑक्टोबरमध्ये टोमॅटोचे दर १२१.९ टक्क्यांनी महाग झाले आहेत. यापूर्वीच्या महिन्यात ते ८६.९४ टक्के होते. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव २७८.२ टक्क्यांनी वाढले आहेत. सप्टेंबरमधील ३२२.९ टक्क्यांच्या तुलनेत ते कमी आहेत. त्याचबरोबर एकूण भाज्यांचा महागाई दर सप्टेंबरच्या ८९.४० टक्क्यांवरून ७८.४० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
ऑक्टोबरमधील एकूण अन्नधान्य महागाई दर सप्टेंबरच्या १८.४० टक्क्यांवरून किरकोळ १८.२० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक ६.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये हा दर ७.३ टक्के होता. इंधन आणि ऊर्जेमध्येही १०.३० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली आहे.
निर्मिती वस्तूंच्या किमतीदेखील वर्षभरात प्रथमच वाढल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये त्या २.५ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. घसरत चाललेल्या रुपयामुळे आयात महागल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. एकूण घाऊक किंमत निर्देशांकात निर्मित उत्पादनांचा हिस्सा ६५ टक्के आहे.
निर्मिती आणि अन्नधान्याच्या वस्तू वगळता गणला जाणारा मुख्य महागाई दरदेखील एप्रिलनंतर प्रथमच २.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला पतधोरण निश्चितीसाठी हाच दर महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे येत्या महिन्याच्या मध्याला (१८ डिसेंबर) रिझव्‍‌र्ह बँक पतधोरणात व्याजदर कमी करण्याची आशा मावळली आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेने यापूर्वी सलग दोन वेळा रेपो दरात वाढ केली आहे.
रुपया पुन्हा भक्कम
सलग दुसऱ्या दिवसात भारतीय चलन सशक्त बनत ६३ नजीक स्थिरावले आहे. १९ पैशांच्या वाढीसह डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ६३.११ पर्यंत पोहोचला. परकी चलन व्यवहारात रुपया दोन दिवसांमध्ये ६० पैशांनी उंचावला आहे. तत्पूर्वी चलनाने २०९ पैशांचे अवमूल्यन नोंदविले आहे. रुपयाच्या घसरणीमागे कोणतेही ठोस कारण नाही, तसेच चालू खात्यावरील तूट अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आशावादाने भारतीय चलनात भक्कमता नोंदली गेली आहे.