03 August 2020

News Flash

बाहेरचे आणि आतले…

झटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात.

झटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात. ती असतातही चांगली, पण ती लावून आपण स्थानिक वनसंपदेवर अन्याय तर करत नाही ना, याचा विचार करायची वेळ आली आहे..

येणार येणार म्हणताना अंत पाहत, दबकत दबकत पाऊस आलाय. आपण वाटेल तशा मारलेल्या थपडा निसर्ग गुपचूप सहन करीत असतो आणि त्याने मारलेली कमी पावसाची एकच थप्पड आपल्याला पार कोलमडवून टाकते. बेसुमार वृक्षतोड हे दुष्काळाच्या अनेक कारणांपकी एक आहेच. मी मुलांबरोबर होणाऱ्या निसर्गगप्पांमध्ये एक गोष्ट नेहमी सांगते की, जंगल हे जणू स्पंजसारखं असतं. त्याच्यावर पडलेलं पाणी शोषून घेऊन नंतर ते हळूहळू सोडत राहतं. जागोजागी असलेले असे स्पंज आपण विकासाच्या नावाखाली सतत नष्ट केले तर जमिनीत पाणी धरून ठेवून ते हळूहळू बाहेर सोडण्याचं काम कोण करणार? या प्रश्नाचं उत्तर शोधताना दमछाक होते. दर पावसाळ्यात उत्साहाने आपण झाडं लावतो, बिया घाटात वगरे टाकण्याचं काम करतो नि झालं एकदाचं आपलं काम म्हणून हात झटकून मोकळे होतो. गंमत म्हणजे, ही जबाबदारी पार पाडत असताना, लावलेली झाडं देशी आहेत की विदेशी आहेत हेही आपण माहीत करून घेत नाही. बरीचशी विदेशी झाडं ही झटपट वाढतात म्हणून लागवड करताना प्राधान्य दिलेली असतात. मात्र या झाडांचा नजरेला हिरवं दिसणं याखेरीज कुठलाही उपयोग स्थनिक आसमंताला होत नसतो. तरीही ही झाडं लावली जातात. यापकी काही झाडं पटापट मोठी होतात, तर काही झाडं हळूहळू आपला विस्तार वाढवतात. इतकी हळूहळू ती मोठी होतात की या झाडांनी आपल्याआधीच्या दोन-तीन पिढय़ाही पाहिलेल्या असतात. आज आसमंतातल्या अशाच काही विदेशी पण शतायुषी झाडांबद्दलच्या गप्पा.

सोशल मीडियाने आपल्या विचारसरणीत बरेच बदल घडवले असले तरीही बऱ्याचदा, शहानिशा न करता आपण अनेक फोटो फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पुढे पाठवत असतो. मध्यंतरी असाच एक फोटो माझ्याकडे आला. त्यातल्या झाडाबद्दल लिहिलं होतं की भारतातलं अत्यंत दुर्मीळ, भगवान शंकरांचं आवडतं झाड पाहायला विसरू नका. तो फोटो पाहिल्यावर लक्षात आलं की दुसरं-तिसरं काही नसून फोटोतलं झाड होतं कैलाशपती ऊर्फ कॅनन बॉल ट्री. या झाडाबद्दल उल्लेखलेले ‘अतिशय दुर्मीळ’ हे शब्द वाचल्यावर अनेक ठिकाणी पाहिलेली मोठी मोठी कैलाशपती ऊर्फ नागलिंग झाडं आठवली. झाड दुर्मीळ नाही पण अगदी सहजही दिसत नाहीच. मोठय़ा फुलामुळे आणि तोफगोळ्यासारख्या फळामुळे कायम लक्षात राहणारं झाड म्हणजे कैलाशपती. बहुतांश लोकांचा एक पक्का गरसमज या झाडाबद्दल असतो, तो म्हणजे हे झाड भारतीय आहे आणि हिमालयातून आलंय! वस्तुत: लेसिथिडेसी कुळातलं हे झाड दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलं नि त्याच्या फुलांच्या आकारामुळे शिवाचं झाड बनून आपलंच होऊन गेलंय. तोफगोळ्यांसारख्या फळांमुळेच कॅनन बोल ट्री असं भारदस्त इंग्रजी नाव मिरवणारं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘कौरोपिटा गायनेन्सिस’ या नावाने ओळखलं जातं. याच्या या नावातलं पहिलं नाव कौरोपिटा हे स्थानिक नावावरून दिलं गेलं असून शेवटचं गायनेन्सिस हे नाव गियाना या प्रांताचा निर्देश करतं. याचाच अर्थ असा की, दक्षिण अमेरिकेतल्या गियाना प्रांतातल्या जंगलांमध्ये या झाडाचं मूळ स्थान आहे. दूरवरच्या अमेझॉनच्या पर्जन्य जंगलातून हे झाड आपल्याकडे आलंय.

कैलासपती वृक्ष त्याच्या उंचीमुळे आणि भारदस्त दिसण्याने ओळखायला अगदी सोप्पा जातो. उंच म्हणजे अगदी पंचाहत्तर फूट इतकी उंची गाठणारा हा पानझडी वृक्ष अगदी वैशिष्टय़पूर्णच म्हणावा असा असतो. इतर झाडांसारखं भरगच्च फांद्याफांद्या, पानंपानं न खेळता लांब मोकळ्या फांद्या अंगोपांगी मिरवतो. याची पानं लंबगोलाकार असतात, जी वर्षांतून नियमित दोन-तीनदा गळतात. तेव्हा झाड अगदी उघडवाघडं वाटतं. अर्थात याला पालवीही लवकर फुटते नि झाड डेरेदार होऊन जातं. कैलाशपतीला जवळून पहिलं की लगेच जाणवतं ते म्हणजे या झाडाच्या फांद्यांखेरीज जाड लांब शाखा येतात, ज्यावर फुलं आणि फळं आलेली दिसतात. जाडय़ा दोरासारख्या शाखा नि त्यावर दाटीवाटीने येणारी फुलं अगदी लक्षात राहण्याजोगीच. नुसत्या या शाखाच नाही तर अगदी खोडावरसुद्धा ही फुलं नि फळं येतात. याचं फुलं नि फळं मिरवाणारं हे खोड दणकट सदरात जमा होतं. कैलाशपतीची साल अगदी खरखरीत नि गर्द मातकट रंगाची असते. या झाडाचं लाकूड उच्च प्रतीचं नसल्याने हलक्या वापरासाठी उपयोगात आणलं जातं.

साधारण हिवाळ्यात फुलणाऱ्या या वृक्षाला कैलासपती हे नाव कदाचित त्याच्या फुलांमुळे मिळालं असू शकतं. या वृक्षाची फुलं दिसायला अगदी वैशिष्टय़पूर्ण अशी असतात. हाताच्या तळव्यांत मावेल अशी ही फुलं साधारण आठ-दहा सेमी एवढी होतात. लालसर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या मनमोहक मिश्रणातून फुलणारी कैलासपती फुलं अत्यंत सुवासिक असतात. जवळून पाहिल्यावर ही फुलं चकचकीत दिसतात. कारण यांच्यावर नसíगक मेणाचा थर असतो. या मांसल नि जाडसर फुलाच्या सहा पाकळ्या एकमेकांपासून सुटय़ा असतात. या पाकळ्यांचा आकार काहीसा खोलगट बशीसारखा आतल्या बाजूला वळलेला असतो. याच्याच जोडीला यातले शेकडो पुंकेसर जोडले जाऊन नागाच्या फण्यासारखा आकार निर्माण करतात. या पाकळ्यांच्या मध्यभागी असलेले स्त्रीकेसर शंकराच्या िपडीसम दिसतात. या अद्वितिय नसíगक रचनेमुळेच याला कैलासपती, नागलिंगम, शिवयलंग, गौरीपती अशी नावं मिळाली असावीत. या फुलांचा वापर सुगंधनिर्मितीसाठी केला जातो.

आता या झाडाचा दांडगा भाग म्हणजे ती तोफगोळ्यासारखी दिसणारी फळं! साधारण तळहातात मावण्यापासून अगदी लहान कलिंगडाच्या आकाराची होऊन झाडाच्या खोडाला लटकणारी ही कठीण कवचयुक्त चेंडूफळं अगदी लेकुरवाळ्या फणसाची आठवण करून देतात. वेगवेगळ्या आकारांची लहान-मोठी फळं खोडावर, शाखांवर दाटीवाटीने लगडलेली दिसून येतात. हे तोफगोळे पूर्णत: पिकायला साधारण दीड वर्षांचा कालावधी लागतो. या दीड वर्षांच्या काळात, बाजूला नवीन फुलं, फळं ही येतच असतात. म्हणूनच हे झाड सतत फळाफुलांनी लगडलेलं दिसतं. या फळांच्या आत पांढरट-पिवळसर रंगाचा गर असतो जो अतिशय दरुगधीयुक्त असतो. मानवी खाण्यास हा अयोग्य असल्याने हा फळांच्या नादी कुणी लागत नाही. माकडं मात्र ही फळं खातात, असं मत अनेक अभ्यासकांनी नोंदवलं आहे. पिकल्यावर ही फळं उंचावरून पडून फुटतात. त्या वेळेस येणारा आवाज मोठा तर असतोच, पण जर का खाली मनुष्य अथवा कुठला प्राणी असल्यास त्याला सडकून मारही बसतो. आजतागायत झालेल्या संशोधनातून निष्पन्न झालंय की, हे झाड मानवाला खूप उपयुक्त आहे. परदेशात मद्यनिर्मितीसाठी या फळाच्या गराचा उपयोग होतो. हल्ली आपल्याकडेही सुशोभीकरणासाठी हे झाड वापरलं जातंय. दीर्घायू असलेल्या या झाडाची फार निगराणी राखायला लागत नसल्याने अनेक ठिकाणी हे झाड सुशोभीकरणासाठी लावलं जातंय. माझ्या पाहण्यात डोंबिवलीत, ठाण्यात शंभरी गाठायला आलेली दोन-तीन झाडं आहेत.

कैलाशपतीच्या तोफगोळ्यांसारखचं वेगळं दिसणारं फळ मिरवणारं एक झाड अनेक ठिकाणी लक्ष वेधून घेतं. लांबलांब दंडगोल आकाराच्या मोठय़ा जून झालेल्या रानकाकडय़ा झाडावर लटकताना दिसल्यावर खुशाल समजायचं की हे सॉसेज ट्री नामक झाड आहे. साधारण पंधरा मीटर्सची उंची गाठणारा हा डेरेदार वृक्ष काय हिरवागार असतो! पश्चिम आफ्रिकेच्या भागातून आपल्याकडे आलेल्या या झाडाला कुठल्याच भारतीय भाषेत नाव नाहीये. हल्ली मराठीत त्याला ब्रह्मदंड हे नाव ठेवलं गेलंय. िहदी आणि बंगालीत ‘झार फनूस’ म्हणून बारसं झालेलं हे झाड वनस्पतिशास्त्रात ‘कायगेलिया अफ्रिकाना’ नावाने ओळखलं जातं. बहुतेक त्याच्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या सावलीमुळे हल्ली ‘बिग्नोएसी’ कुळातलं हे झाड आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसायला लागलंय. दणकट खोडाच्या या झाडावर काही मीटर्स उंचीनंतर भरपूर फांद्या येतात. या फांद्या मातकट हिरवट रंगाच्या पानांनी कायम बहरलेल्या असतात. गुच्छागुच्छातली पानं डोळ्यांना अतिशय आकर्षक वाटतात, हे मात्र नक्की. या झाडाला येणारी फुलं मोठय़ा मजेशीर प्रकारची असतात. वरून खाली येणारी एखाद फूट दोरी आणि तिच्यावर येणारी नक्षीदार पणतीसारखी गर्द मरून किरमिजी रंगाची सात-आठ सेमी लांबीची फुलं ठरावीक अंतरावर संध्याकाळी फुलतात. या फुलांना घाणेरडा वास असतो. या वासावर आकर्षति होणाऱ्या कीटकांना खायला अनेकदा लहान वाघळं झाडाभोवती उडताना दिसतात. साधारण उन्हाळ्यात फुलणाऱ्या फुलांनंतर हिवाळ्याच्या सुमारास झाडावर अगदी पाच-सहा किलो वजनाची फळं लोंबकळताना दिसतात. ही फळं जून काकडीसारखी नि दुधी भोपळ्यासारखी दिसतात. पावसाळ्यात, जोरदार वाऱ्याने वाहनांवर, माणसांवर पडून इजा करणाऱ्या या विषारी असलेल्या फळांचा आपल्याला काहीच उपयोग नाही. निव्वळ झटपट वाढतं म्हणून हे निरुपयोगी परदेशी झाड सध्या आपल्याकडे लावलं जातंय.

या परदेशी झाडांच्या जोडीला, एक परक्या झाडाला भारतीयांनी आपलंसं केलंय. साधारण सात-आठशे वर्षांपूर्वी, गुलाम म्हणून समुद्रमाग्रे िहदुस्थानात आणल्या गेलेल्या काळ्या हबशी मजुरांच्या सोबत आपल्याकडे आलेला बाओबाब ऊर्फ गोरखचिंच या बहुगुणी झाडाबद्दल लिहावं तेवढं कमीच. ‘कुणी हजारो र्वष जगू शकतं का हो’, या प्रश्नाचं उत्तर मी ‘हो’ असं देते तेव्हा लोक हसतात. कुणालाही अतिशयोक्ती वाटेल, पण बाओबाब ऊर्फ गोरखचिंच पृथ्वीवर जिवंत असलेला आणि जिवंत राहणारा सर्वात जुना जीव आहे. पूर्व आफ्रिका हे माहेरघर असलेला हा महावृक्ष आजमितीस बेचाळीस देशांमध्ये आढळतो. मिशेल अ‍ॅडनसन या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ नामकरण केला गेलेला हा महावृक्ष, ‘अ‍ॅडनसोनिया डिजिटाटा’ या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखला जातो. भारतात याला गोरखचिंच म्हणण्यामागचे कारण, गोरखनाथांनी या वृक्षाखाली बसून शिष्यांना उपदेश केला होता असं सांगीतलं जातं. बाकी चिंच आणि या फळाचा दूरान्वयेही संबंध येत नाही. आपल्याकडे आढळणाऱ्या काटेसावरीच्या ‘बॉम्बॅकेसी’ कुळात याची गणना होते. आकाराने प्रचंड असलेल्या बाओबाबचा बुंधा अगदी दहा मीटर्सचा व्यास गाठू शकतो. बाओबाब आपल्या अंगावर प्रचंड फांद्या मिरवत नाही, पण पानझडी प्रकारात गणला जाणारा हा महावृक्ष हिवाळ्यात आपली सगळी पानं गाळतो नि अगदी बोडका होऊन जातो. या दांडगोबाला अनेक वर्षांनी उन्हाळ्यात फुलं येतात. ही फुलं एकेकटी, पांढरी नि हातभर मोठी असतात. बाओबाबची उग्र वासाची फुलं संध्याकाळी उमलतात तेव्हा जणू पांढरे आकाश दिवेच वाटावे अशी दिसतात. यातून पुढे येणारं फळ, अर्थात गोरखचिंच, हे पोपटी हिरवट रंगाचं असतं. साधारण वीतभर मोठय़ा होणाऱ्या फळाच्या आत पांढरट गरात काळपट बिया असतात. या बिया रुजायला खूप अवघड असतात नि अनेक महिनेही लावतात. कारण यावर असलेलं आवरण कठीण असतं. असं हळूहळू मोठं होणारं झाड, नीट जगलं तर हजारो र्वष डौलात उभ राहतं. आजच्या घडीला, आफ्रिकेत दोन-अडीच हजार वष्रे जुनी बाओबाब झाडं आहेत. आफ्रिकेत या बाओबाबला जीवनवृक्षच मानतात. याची फळं ही सर्वोत्तम ऊर्जास्तोत्र मानली जातात. याच जोडीला, याच्या बुंध्यांचा वापर चक्क हजारो लिटर्स पाणी साठवण्यासाठी केला जातो. राहण्यासाठी, बसचे थांबे म्हणून, हॉटेल्स व दारूचे गुत्ते म्हणूनही या झाडांच्या बुंध्यांचा वापर केला जातो ही गंमतच आहे नाही? आजमितीस, आपल्याकडे आंध्र प्रदेशातल्या, गोवळकोंडा किल्ल्यात असलेलं बाओबाब, भारतातलं सर्वात जुनं बाओबाब झाड म्हणून ओळखलं जातं. साधारण सातशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या या झाडाला ‘हातीयों का पेड’ असं संबोधलं जातं. आपलाकडे, अनेक राज्यांमध्ये शंभरी उलटून गेलेल्या गोरखचिंचेच्या झाडांना स्मारकांचा, अर्थात हेरिटेज मॉन्युमेन्ट्सचा दर्जा दिला गेला आहे. अशा या लििव्हग लिजंडबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. एकदा तरी हा बाओबाब जवळून पाहावा असाच असतो. महाराष्ट्रात, मुंबई, वसई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, वाई या शहरांमध्ये हे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशात, नर्मदेच्या किनारी तर चक्क बनं आहेत यांची. आपल्या अनेक पिढय़ांशी संवाद साधलेल्या या महावृक्षाला एकदा तरी जरूर अनुभवा.

एक जुलैला आपल्याकडे कोटीच्या कोटी झाडं लावण्याचा संकल्प सरकार आणि काही संस्थांनी केला आहे. त्यातली किती जगतील हा शंकेचा प्रश्न आहेच. स्थानिक पर्यावरणात शतकानुशतकं जगलेली, तगलेली झाडंच रोपण करणं गरजेचं असतं. बाओबाबसारखा अपवाद वगळता, बहुतांश परदेशी झाडं, आपल्या पर्यावरणासाठी उपयुक्त नसतात. झटपट वाढतात म्हणून त्यांना लावून, आपल्या स्थानिक वनसंपदेवर आपण अन्याय करणार नाही याची काळजी झाड लावताना घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून सांगितलं आहेच की वड, िपपळ, चिंच, औदुंबरासारखी झाडं लावणारे कधीच नरकात जात नाहीत. पूर्वजांचं हे अनुभवसिद्ध शहाणपण आसमंतात फेरफटका मारला की निश्चितच जाणवतं. तेव्हा आता तरी शहाणे होऊ या आणि या पावसाळ्यात भारतीय वृक्ष लावू या.
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:04 am

Web Title: local trees and foreign trees
Next Stories
1 जांब आणि मुंग्या..
2 उन्हाळी आनंद सोहळा
3 वृक्ष-फुलं-पक्षी- प्राण्यांच्या देशा…
Just Now!
X