05 August 2020

News Flash

वाचकांचे अभिप्राय हीच ऊर्जा

लिखाणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विचारशक्तीला चालना मिळते.

मिलिंद कल्याणकर

मी डिसेंबर २०१३ मध्ये रीतसर निवृत्त झालो. साधारणत: १९७५ मध्ये माझे पहिले लिखाण महाविद्यालयाच्या वार्षिकात प्रसिद्ध झाले होते तेव्हापासून माझा लेखनप्रवास सुरू झाला होताच. त्यानंतर जवळजवळ २० वर्षे विविध जबाबदाऱ्यांमुळे हातून काही लिहिणे झाले नव्हते. २००१ मध्ये मी पुन्हा लिहिण्यास सुरुवात केली ती आजपावेतो. निवृत्तीनंतर शांत व तणावविरहित आयुष्य जगायचे असे मी ठरवले होतेच. त्याप्रमाणे कोणाचीही बांधिलकी नसल्यामुळे स्वच्छंदी लिखाणाकडे पुरेपूर लक्ष द्यायला सुरुवात केली. अर्थात घरातील कामे सांभाळून. आपल्या निवृत्तीनंतर आपला जोडीदारही आपल्याकडून घरगुती कामाची अपेक्षा करतो व तीही पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे.

लिखाणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विचारशक्तीला चालना मिळते. विविध विषयांवरील लिखाणामुळे विचारातील ताजेपणा अबाधित राहतो. वायफळ गप्पांना आपोआपच खीळ बसते. लिखाण म्हटले की, वाचन आलेच. वाचन हे लिखाणाचे अविभाज्य अंग आहे. सकस वाचन हे लिखाणात प्रतिबिंबित होते. वाचनामुळे विचार प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. समान विचारी मित्रमंडळींमुळे विचारांना चालना मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाचन-लिखाणामुळे आपल्या बोलण्यात आपोआपच परिपक्वता येते. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते. लेखन प्रसिद्ध झाल्यावर काही वाचक लेखन आवडल्याचं आवर्जून फोन करून सांगतात. अशा रसिक वाचकांचे फोन, अभिप्राय हीच लेखकाची ऊर्जा असते. आजच्या आधुनिक युगात विविध ‘सोशल साइट्स’वरून लेखनावर अभिप्राय मिळण्याची सोय झाली आहे. अगदी सातासमुद्रापलीकडे असलेला रसिक वाचकही काही मिनिटांत त्याचा अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोचवतो.

लिखाणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ‘वेळ कसा घालवायचा’ हा प्रश्न अजिबात पडत नाही. कधी कधी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीकडून असा काही मुद्दा उपस्थित केला जातो की आपण त्यावर विचार करण्यास आपोआप प्रवृत्त होतो. त्या मुद्दय़ाचा विचारविस्तार करून लिखाणाला एक नवीन विषय मिळतो. आज चार वर्षे झाली, पण अजूनपर्यंत ‘आता मी काय करू’ हा प्रश्न पडलेला नाही.

– मिलिंद कल्याणकर, नेरुळ, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 1:02 am

Web Title: return to writing after retirement
Next Stories
1 सत्तरीनंतरचा मस्त, मजेत प्रवास
2 वृद्धत्वाचा आनंदोत्सव
3 अपंगांच्या चेहऱ्यावरील आनंद
Just Now!
X