भाजपमध्ये असंतोष; शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे रस्त्यांवर राडे

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही रण माजले आहे. तीन शाखांना टाळे ठोकत शिवसेनेतील नाराजांनी रस्त्यावरच राडे सुरू केले, तर नेत्यांचे नातेवाईक, समर्थकांना तिकीटे बहाल केल्याने शिस्तबद्ध भाजपच्या निष्ठावंतांमध्येही असंतोष धुमसू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धावपळ करावी लागली. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून निरुपम-कामत समर्थकांमध्ये जुंपली आहे.

महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ तोंडावर आली तरी या असंतोषामुळे भाजप व शिवसेनेच्या उमेदवारी याद्या गुरुवारी उशिरापर्यंत अधिकृतपणे जाहीर झाल्याच नाहीत. मारामाऱ्या, तिकीटांची कापाकापी, समर्थकांची वर्णी, नाराजांची बंडखोरी, व पक्षांतरे यांमुळे आज दिवसभर सेना-भाजपचे राजकारण ढवळून गेले. शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी बुधवारी रात्रीपासूनच नेत्यांकडे ‘फिल्िंडग’ लावत तिकिट मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, शिवसेनेच्या उमेदवारांना ए, बी फॉर्म देण्यास सुरुवात झाल्यावर निराश इच्छुकांमध्ये संताप खदखदू लागला. आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर, नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयांपुढे निदर्शने झाली व पुतळे जाळण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी थेट ‘मातोश्री’वर धाव घेतली. वडाळा, जिजामातानगर व ऑर्थररोड परिसरात शाखा क्रमांक १९५,१९७ व १९९ ला टाळे ठोकण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीला तर विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी दिल्याने संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी शाखेबाहेरच ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेने सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान यांना दादरमधून उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले, तर आदित्य ठाकरे यांचे सहकारी अमेय घोले यांना उमेदवारी दिल्याने माधुरी मांजरेकर यांच्या समर्थकांनी पक्षाच्या शाखेला टाळे ठोकले.

गेले चार दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी प्रदीर्घ बैठका घेऊनही भाजपच्या यादीला अंतिम स्वरूप देता आलेच नाही. मुंबइ भाजपाध्यक्ष आशिष शेलार व अन्य नेत्यांमदील मतभेदांमुळे समर्थकांच्या उमेदवारीची कापाकापी सुरू झाली. खासदार महाजन, किरीट सोमय्या व गोपाळ शेट्टी यांच्यावर त्यांच्या मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. त्यामुळे आपल्या पसंतीचे उमेदवार असावेत, यासाठी त्यांचा आग्रह होता. पण काही नावांना शेलार यांनी विरोध केला. खासदार पूनम महाजन व आशिष शेलार यांच्यात अलीकडे सुसंवाद राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी सुचविलेल्या नावांना शेलार यांनी जोरदार विरोध केला. भाजपच्या सोशल मीडीयाचे काम पाहणाऱ्या जितेन गजरिया यांच्या टिळकनगरमधील उमेदवारीला शेलार यांचे समर्थन होते. तेथे पूनम महाजन यांनी सुचविलेल्या सुशम सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. डावललेल्या काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरुन बंडखोरीची तयारी सुरु केली असून, पक्षाने उमेदवारी दिलेल्यांना धूळ चारण्यासाठी नाराजांच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

काँग्रेसमध्ये गटबाजी

मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून प्रचंड गदारोळ झाला असून, या वादात गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या गटाचे कार्यकर्ते गुरुवारी परस्परांना भिडले. विविध नेत्यांनी आपापल्या भागातील पक्षांतर्गत विरोधकांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केल्याने घोषणाबाजी, गोंधळ सुरूच होता. मुंबई काँग्रेसने ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यापासून गटबाजी वाढली आहे. उर्वरित उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता बैठका सुरू असतानाच गोंधळ, परस्परांच्या अंगावर धावून जाणे, घोषणाबाजी हे प्रकार सुरू होते. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व पक्षाने नेमलेले निरीक्षक भूिपदसिंग हुड्डा यांच्या समक्ष हा सारा प्रकार सुरू होता. गुरुदास कामत आणि संजय निरुपम गटाचे कार्यकर्ते सकाळी हुड्डा यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना परस्परांच्या अंगावर धावून गेले. हुड्डा यांच्या समोर माजी मुख्यमंत्री नारायण राणे समर्थकांनीही घोषणाबाजी केली. गोंधळ वाढल्याने शेवटी पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला.

दानवेंना दूर ठेवले?

मुंबई व अन्य काही महापालिकांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हेच सर्व निर्णय घेत असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दूर ठेवण्यात आल्याचे समजते. त्यांना केवळ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आणि मराठवाडय़ात लक्ष घालण्याची सूचना देण्यात आली असून मुख्यमंत्री फडणवीस हेच पक्षाची सर्व धुरा सांभाळत आहेत. दानवे यांनी राज्यस्तरीय ‘वॉर रुम’ ही सुरु केली. मात्र तिचा सर्व ताबा व नियंत्रण फडणवीस यांच्याकडेच आहे.