सर, मी करिअर मंत्र नियमित वाचतो. मी बीए शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अर्थशास्त्र विषय आहे. नंतर काय करावे? एमपीएससी/ लॉ की दुसरा कोर्स करावा? माझी आर्थिक स्थिती चांगली नाही. – अरविंद थवील

मित्रा, टी.वाय. बीए करत असताना अवांतर वाचन वाढवून, कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीत शिकून घे. इंग्रजी व मराठीतून कॉम्प्युटरचा विविध गरजेनुसार वापर करणे शिकलास तर तुला नोकरीची कधीही चिंता पडणार नाही. तुझ्या निमित्ताने लोकसत्ता करिअर वृत्तांतच्या अनेक वाचकांना मुद्दामहून सांगत आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांनी पदवीनंतर प्रथम दोन वर्षे नोकरी करून स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा जरूर प्रयत्न करावा. मगच पुढे काय हा विषय सुरू होतो. याचे साधेसे कारण म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची फी जास्त असते व त्या मानाने नोकरीच्या पगाराचा परतावा मिळतोच याची खात्री नसते. तुझा विषय अर्थशास्त्र असल्यामुळे तो खऱ्या अर्थाने फक्त चर्चेचा व संशोधनाचा विषय आहे हे तुला कळले असावे. तुझ्या मनातल्या लिहिलेल्या दोन्ही गोष्टींचा थेट अर्थार्जनाशी फारसा संबंध येणार नाही म्हणून त्याचा विचार आता नको. शेवटचा पेपर झाला की नोकरीचा शोध सुरू कर.

मी आता द्वितीय वर्ष वाणिज्य यात शिकत आहे. माझे पदवी शिक्षण पूर्ण करणार आहे. मी आता नागरी सेवाच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला आहे. मला दहावी मध्ये ८४.८० टक्के तर बारावीला ७७.७८ टक्के गुण मिळाले आहेत. मी नागरी सेवेचा अभ्यास आता सुरू करणे योग्य आहे का? नागरी सेवा परीक्षा मराठीमधून दिलेली योग्य ठरेल का ? – राजेश्वरी संतोष सरोणे.

कॉमर्स पदवीधरांना स्पर्धा परीक्षा कठीण जातात. त्यांचा मुख्य भर अकाउंटस वर असतो. आत्ता अभ्यास सुरू न करता ७५ टक्के मार्क मिळवून बीकॉम पूर्ण कर. त्यानंतर चांगल्या संस्थेतून एमबीए फायनान्स पूर्ण करणे यावर लक्ष केंद्रित करावेस. तुझे आजवरचे मार्क पाहता हे शक्य आहे. एमबीएनंतर दोन वर्षे चांगली नोकरी मिळवून आर्थिक पाया भक्कम होईल. त्यावेळी तुझे वय जेमतेम २६ असेल. नोकरी दरम्यान स्पर्धा परीक्षांचे स्वरूप समजून घेणे व अभ्यासाची पूर्वतयारी करणे शक्य आहे. यशाची शक्यता या पद्धतीत बरीच वाढेल. याउलट आत्ता अभ्यास सुरू केल्यास बीकॉमचे मार्कही कमी होतील, हाती नोकरीही मिळणार नाही. स्पर्धा परीक्षातील यशाची शक्यता अंधुक राहील.

हेही वाचा : Success Story : स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे स्वप्न, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये मिळवले ३३७ गुण; वाचा सर्वेश मेहतानीचा प्रवास

u

आत्ता फार तर करियर वृत्तांतचे वाचन व रोजचे अग्रलेख वाचणे या पलीकडे काही करावे असे मला सुचवावे वाटत नाही. सहज एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये चौकशी केली तर असे लक्षात येईल की वाणिज्य शाखेची अत्यल्प मुले या रस्त्याला लागली आहेत. नीट माहिती घेऊन योग्य तो निर्णय तू घे.

मी टी.वाय. बीए यशवंतराव मुक्त विद्यापीठात करत आहे. मी एमपीएससीचा अभ्यास करते. क्लास चालू आहेत. दीड वर्षापासून सर्व शालेय व संदर्भ पुस्तके वाचत आहे. पण एक पुस्तक वाचलं की दुसरं वाचायला लागल्यावर पहिलं वाचलेलं लक्षात राहत नाही. उत्तर कशी लिहावी समजत नाही. रिव्हीजन कशी करू समजत नाही. वेळ भरपूर मिळतो अभ्यासाला मात्र कधी कधी मन लागत नाही. – शिवानी जाधव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचलेले लक्षात राहत नाही, त्यामुळे विश्वास ढळत असेल तर स्वत:च्या नोंदी (नोट्स) करणे व सध्या तो विषय बाजूला ठेवणे यावर भर द्यावा. प्रत्यक्ष परीक्षा तुला २६ किंवा २७ साली द्यायची आहे आता प्रश्नोत्तरे लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही. वेळ भरपूर आहे पण लक्ष लागत नाही. याचे महत्त्वाचे कारण मुक्त विद्यापीठातून परीक्षा देत असल्यामुळे विद्यार्थिनी, सहकारी वा मित्र मैत्रिणी यांचा अभाव हे असू शकते. दिवसातील वेळेचे नियोजन करताना दोन तृतीयांश वेळ बीएच्या अभ्यासाला द्यावा असं मुद्दाम सुचवत आहे. एक तास वृत्तपत्र वाचन करून सामान्य ज्ञान वाढवणे व अग्रलेख वाचणे यासाठी ठेव. फक्त रविवारी स्पर्धेतील पूर्व परीक्षेची तयारी केली तर अभ्यास करण्याला शिस्त लागेल व हाती उद्दिष्ट राहील. तुझे आजवरचे कोणतेच मार्क न कळवल्यामुळे एवढेच काय बीएचा विषयही न कळवल्याने मी हे मोघम उत्तर दिले आहे.