करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, सर्वच क्षेत्रांना यामुळे आर्थिक झळ बसली आहे. करोनामुळे मागील काही महिन्यात रोजगाराच्या संधी कमी होण्याबरोबरच रोजगार कपात सुरू झाली होती. दरम्यान करोना काळात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकऱ्या वाढल्या असल्याचं नोकरी डॉट कॉमच्या अहवालात म्हटलं आहे.

करोनामुळे उद्योगांसह कंपन्यांनी रोजगार कपातीकडे मोर्चा वळवला होता. त्याचबरोबर अनेक उद्योगांनी पदभरतीच थांबवली होती. मात्र, सर्वच क्षेत्र आता हळूहळू करोनातून सावरू लागले असल्याचं दिसत आहे. नोकरी डॉट कॉमनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोकऱ्यांची संख्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ३३ टक्क्यांनी वाढली असल्याचं म्हटलं आहे.

नोकरी डॉट कॉमच्या माहितीप्रमाणे रोजगार निर्मितीत महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रात जूनमध्ये ही वाढ झाली आहे. यात एफएमसीजी (फास्ट मुव्हींग कन्झ्युमर गुडस्) क्षेत्रात ५८ टक्के, अकाउंटिंग ५३ टक्के, बीपीओ/आयटीईएस ४८ टक्के, आयटी हार्डवेअर ३७ टक्के व आयटी सॉफ्टवेअर या क्षेत्रात १९ टक्क्यांनी नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.

त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ४९ टक्क्यांनी नोकऱ्यांची संधी वाढली आहे. तर फार्मा/बायोटेक ३६ टक्के, सेल्समध्येही ३३ टक्क्यांनी नोकऱ्यांची संख्या वाढल्याचं अहवालात म्हटलं आहे. “अनलॉक १.०च्या घोषणेनंतर नोकर भरतीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं असून, हे उत्साह वाढवणारं आहे. येणाऱ्या काही महिन्यात यात आणखी वाढ होऊन नोकर भरतीची प्रक्रिया पूर्वपदावर येईल अशी आम्हाला आशा आहे,” असं नोकरी डॉट कॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी म्हटलं आहे.