रिपाईंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी करोनावर मात केली. त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रूग्णालयातून रविवारी, ८ नोव्हेंबरला डिस्चार्जदेखील मिळाला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामदास आठवले यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फोन करून माझ्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.कोरोना बाधा झाल्यानंतर 12 दिवस उपचार घेऊन आता तब्येत चांगली झाल्याची त्यांना माहिती दिली.माझी तब्येत अधिक चांगली व्हावी यासाठी पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे”, असे ट्विट करून त्यांनी या चर्चेची माहिती दिली.

दरम्यान, रामदास आठवले करोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी साऱ्यांनीच प्रार्थना आणि सदिच्छा दिल्या होत्या. त्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या सदिच्छा विशेष चर्चेत होत्या. “करोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा,” असं म्हणत अनिल देशमुख यांनी आठवले यांच्याच शैलीत त्यांना सदिच्छा दिल्या होत्या.

देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. मात्र ‘गो कोरोना’चा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांचा करोना चाचणीचा अहवाल २७ ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते १२ दिवसांनी घरी परतले.