Bihar Road: जोड रस्ता नसताना नदीवर बांधलेला पूल, निर्माणाधीन पूलच वाहून जाणे, अशा प्रकारच्या अनेक घटना बिहारमध्ये याआधी घडलेल्या आहेत. बिहार सरकारने दशकभरात हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले आहेत. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी तीन लाख कोटींची तरतूद रस्तेबांधणीसाठी केली आहे. मात्र सरकारच्या या प्रयत्नांना कंत्राटदार हरताळ फासत असल्याचे एक प्रकरण सध्या समोर आले आहे. जेहानाबाद जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचा रस्ता बांधण्यात आला, मात्र या रस्त्याच्या मधोमध झाडे तशीच ठेवण्यात आली आहेत.
जेहानाबाद जिल्ह्यात पाटणा-गया या रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरूस्ती करण्यात आली. आठ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. सध्या रस्ता बांधून मोकळा आहे, पण रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे तशीच ठेवण्यात आली आहेत. यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजधानी पाटणा पासून अवघ्या ५० किमी अंतरावर सदर रस्ता आहे. मात्र रस्त्यावर झाडे तशीच ठेवल्यामुळे सध्या या रस्त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंत्राटदार आणि प्रशासनाला यावरून ट्रोल केले जात आहे.
सदर रस्त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यातील खरी माहिती समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने १०० कोटींचा रस्ता रुंदीकरण प्रकल्प हाती घेतल्यानंतर वन विभागाकडे रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे तोडण्याची परवानगी मागितली. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. या बदल्यात वन विभागाने १४ हेक्टर वन जमीन भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी केली.
जिल्हा प्रशासनाने ही मागणी पूर्ण केली नाहीच. उलट त्यांनी झाडे न तोडता त्याच्या बाजूने रस्ता तयार करण्याचे कंत्राट दिले. बरं ही झाडेही सरळ रेषेत नाही, त्यामुळे वाहनचालकांना आपण जंगलातून गाडी चालवत असल्याचा अनुभव येईल, अशी खिल्ली आता सोशल मीडियावर उडवली जात आहे.
जेहानाबाद जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी अलंक्रित पांडे यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, सदरचा रस्ता नुकताच बांधण्यात आला असून यावर अद्याप एकही अपघात झालेला नाही. त्या म्हणाल्या की, संबंधित रस्त्याचा काही भाग वन जमिनीवरून जातो. वृक्ष तोडण्याची परवानगी आम्ही मागितली होती, पण तोपर्यंत कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरू केले. कंत्राटदारांने अटींचे उल्लंघन करून बांधकाम केले, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा प्रशासनाने आता कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून झाडे असलेल्या भागात बॅरिकेडिंग्ज लावण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.