scorecardresearch

हवाई दलाला ‘प्रचंड’ बळ ! ; संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर संरक्षण सेवेत रुजू

संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात भारताची क्षमता अधोरेखित करणारा हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

हवाई दलाला ‘प्रचंड’ बळ ! ; संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर संरक्षण सेवेत रुजू
लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर- एलसीएच) भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

जोधपूर : संपूर्ण स्वदेशी बनावटीची वजनाने हलकी लढाऊ हेलिकॉप्टर (लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर- एलसीएच) भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सोमवारी दाखल करण्यात आली. एका औपचारिक सोहळय़ात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या हेलिकॉप्टरचे ‘प्रचंड’ असे नामकरण केले. यामुळे हवाई दलाची शक्ती आणखी वाढणार आहे, कारण ही बहुद्देशीय हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि शस्त्रसज्ज आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात चार हेलिकॉप्टर्स दाखल करण्यात आली. या वेळी सिंह म्हणाले, ‘‘देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणात हवाई दल महत्त्वाची भूमिका बजावते. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात भारताची क्षमता अधोरेखित करणारा हा एक महत्त्वाचा क्षण आहे.  दिवसा आणि रात्रीही कामगिरी बजावण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये आहे. त्याचबरोबर लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची त्यांची क्षमता असल्यामुळे हवाई दलाची लढाऊ शक्ती लक्षणीयरीत्या वाढेल.’’

आपण देशाच्या संरक्षण उत्पादनात वाढ करण्यावर भर देत असल्याचे सांगून सिंह म्हणाले, की देशाच्या संरक्षणास नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरच्या क्षमतेवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी हवाई दलाची प्रशंसा केली. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, की या हेलिकॉप्टरची क्षमता जागतिक स्तरावर त्याच्या श्रेणीतील हेलिकॉप्टरच्या बरोबरीची आहे. याप्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

प्रचंडआणि ध्रुवमधील साम्यस्थळे

यंदा मार्चमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने स्वदेशी बनावटीची १५ हेलिकॉप्टर विकसित करण्यासाठी तीन हजार ८८७ कोटींचा निधी मंजूर केला होता. यापैकी दहा हेलिकॉप्टर हवाई दल आणि पाच लष्करात सामील करण्यात येतील. ही हेलिकॉप्टर आणि ‘अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर- ध्रुव’मध्ये अनेक साम्यस्थळे आहेत, असे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वैशिष्टय़े काय?

‘हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडून (एचएएल) विकसित.

* अधिक उंचीवरून कामगिरी बजावण्याची क्षमता.

* ५.८ टन वजन आणि दोन इंजिन, विविध शस्त्रांच्या वापराची सज्जता.  

* ‘रडार’ला चकवा देण्याची क्षमता, चिलखती सुरक्षा यंत्रणा

* रात्री हल्ला करण्याची क्षमता, आपत्कालीन स्थितीत सुरक्षित उतरवण्याची सोय.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर..

१९९९च्या कारगिल युद्धानंतर अशा हेलिकॉप्टरची गरज भासू लागली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्व लडाखमधील काही ठिकाणी भारत-चीनमध्ये लष्करी तणाव असताना ही हेलिकॉप्टर ताफ्यात सामील होत आहेत. या हेलिकॉप्टरमुळे देशाची संरक्षण शक्ती आणखी वाढली आहे, असेही अधिकारी म्हणाले.

हवाई दलात ‘प्रचंड’चे दाखल होणे हा संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात भारताची क्षमता अधोरेखित करणारा महत्त्वाचा क्षण आहे. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या