राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवारी 'तुमचा लवकरच दाभोलकर होणार' अशी धमकी समाजमाध्यमावरून देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकावणारा भाजपाचा अमरावतीतील कथित कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावलं आहे. "बावनकुळेंनी मान्य केलं पाहिजे की, आपल्या माणसाचं चुकलं आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "दाभोलकरांची हत्या झाल्याचं उभ्या भारतासह महाराष्ट्राला माहिती आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल 'आम्ही तुमचा दाभोलकर करू' म्हणजे काय करणार… दाभोलकर डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करणार का? शरद पवार यांच्याकडेही डॉक्टरेटची पदवी आहे. त्यामुळे बावनकुळेंनी मान्य केलं पाहिजे, आपल्या माणसाचं चुकलं आहे. हे होता कामा नये. महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना सांभाळली पाहिजे." हेही वाचा : श्रीकांत शिंदेंची खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी; भाजपा नेते रवींद्र चव्हाण म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांशी…” "भाजपाचे कार्यकर्ते बोलले, तर अन्यही पक्षातील कार्यकर्ते बोलतील. याने विकासाचे प्रश्न बाजूला राहतील. तसेच, 'तुमचा दाभोलकर करू' म्हटल्यावर ती धमकी नाही, असं म्हणणं तुमच्या स्वत:च्या सद्विवेकबुद्धीला पटतं का?," असा सवाल अजित पवार यांनी बावनकुळेंना विचारला आहे. हेही वाचा : “शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं, खरं म्हणजे…”, संजय राऊतांचं मोठं विधान कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्याबद्दल विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, "तो युतीअंतर्गत प्रश्न आहे. भांड्याला भांड लागतं. त्यामुळे युतीअंतर्गत बसून मार्ग काढतील."