रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता जवळपास दीड महिना होत आला आहे. २४ मार्च रोजी रशियानं युक्रेनमध्ये पहिल्यांदा सैन्य घुसवलं. तेव्हापासून आजपर्यंत रशियन फौजा युक्रेनचा पाडाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, युक्रेनकडून कडवा संघर्ष केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे अमेरिकादी बड्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दिला असताना रशियावर अनेक निर्बंध देखील लादले जात आहेत. मात्र, अजूनही रशिया माघार घ्यायला तयार नाही. त्यासंदर्भात आता अमेरिकेकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. रशियन लष्कर पुतिन यांना फसवत असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुतीन आणि रशियन लष्करामध्ये तणाव!

व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क संचालक केट बेडिंगफील्ड यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “आमच्याकडे माहिती आली आहे की पुतिन यांची रशियन लष्कराकडून फसवणूक केली जात आहे. याच कारणामुळे पुतिन आणि त्यांच्या लष्करामध्ये सातत्याने तणाव वाढू लागला आहे”, असं केट म्हणाल्या.

रशियन लष्कराची ढिसाळ कामगिरी!

दरम्यान, रशियन लष्कराची कामगिरी ढिसाळ होत असतानाही त्याबाबत पुतीन यांना चुकीची माहिती दिली जात असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. “आम्हाला खात्री आहे की रशियन लष्कर कशी खराब कामगिरी करत आहे आणि आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था कशी ढासळत आहे याविषयी त्यांच्या सल्लागारांकडून त्यांना योग्य ती माहिती दिली जात नाहीये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे सल्लागार देखील त्यांना सत्य परिस्थिती सांगायला घाबरतात”, असं केट बेडिंगफील्ड म्हणाल्या आहेत.

Russia Ukraine War: “जर नरेंद्र मोदी मध्यस्थाची भूमिका घेणार असतील…”, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

“रशियानं घातलेला हा धोरणात्मक घोळ समोर आणण्यासाठी आम्ही ही माहिती आता जगासमोर आणत आहोत”, असं देखील त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

दरम्यान, यासंदर्भात रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे वाढत्या दबावामुळे रशिया लवकरच युद्धबंदीची घोषणा करू शकते, असं सांगितलं जात आहे. युक्रेनला वाढता पाठिंबा आणि बड्या देशांकडून होणारी लष्करी, आर्थिक मदत पाहाता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून रशियावर टाकण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ती वेळ टाळता येऊ शकते, असं आंतरराष्ट्रीय संबंधातील जाणकारांचं मत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America claims russian military misleading vladimir putin on ukraine war pmw
First published on: 31-03-2022 at 14:28 IST