Asim Munir Statement About Jammu And Kashmir: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला असून, भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो ‘कायदेशीर संघर्ष’ आहे, असे वक्तव्य केले आहे. याचबरोबर, पाकिस्तान काश्मिरी लोकांना राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देत राहील, असेही म्हटले आहे.
मुनीर यांनी पाकिस्तान नौदल अकादमीतील पासिंग आऊट परेडला संबोधित करताना हे विधान केले. यावेळी त्यांनी असेही म्हटले की, भारताने ‘पाकिस्तानविरुद्ध दोनदा विनाकारण आक्रमण केले आहे’ आणि भविष्यात होणाऱ्या आक्रमणाची जबाबदारी पूर्णपणे आक्रमण करणाऱ्यावर असेल.
मुनीर यांनी भारताविरुद्ध गरळ ओकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एका आठवडा आधी, १६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या परदेशी पाकिस्तानी नागरिकांच्या एका कार्यक्रमात मुनीर यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी काश्मीरचे पाकिस्तानच्या ‘गळ्याची नस’ म्हणून वर्णन केले होते.
दरम्यान मुनीर यांच्या या ताज्या विधानांवर भारतीय अधिकाऱ्यांकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, मुनीर यांच्या काश्मीरबाबतच्या मागील टिप्पण्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावल्या होत्या.
“भारत ज्याला दहशतवाद म्हणतो तो आंतरराष्ट्रीय नियमांनुसार एक कायदेशीर संघर्ष आहे. ज्यांनी काश्मिरी लोकांच्या इच्छेला दडपण्याचा प्रयत्न केला आणि तोडगा काढण्याऐवजी संघर्षाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे”, असे मुनीर कराची येथे उच्च लष्करी अधिकारी, नागरी अधिकारी आणि राजनयिकांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले.
“आम्ही काश्मिरी लोकांच्या अधिकारासाठी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार व काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षेनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ठरावाद्वारे दीर्घकाळ चाललेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे ते पुढे म्हणाले.
आपल्या भाषणात मुनीर यांनी असा दावा केला की, दोनदा भारतीय लष्करी हल्ला उधळून लावल्यानंतर पाकिस्तानने स्वतःला सिद्ध केले आहे. ते पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या बालाकोट हल्ल्याचा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत होते.