Donald Trump on Temporary Pass: अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची कडक कारवाई सुरू असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शेती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या अवैध विदेशी नागरिकांसाठी तात्पुरता पास देण्याची योजना जाहीर केली आहे. रविवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, शेती आणि शेतकऱ्यांची त्यांना काळजी आहे. शेती क्षेत्र वाचविण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या अवैध स्थलांतरितांना ते देशाबाहेर काढणार नाहीत. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांनाही अभय देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
“मी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेत असतो. शेतकऱ्यांच्या शेतात काही लोक १५ आणि २० वर्षांपासून काम करत आहेत. कदाचित ते चुकीच्या मार्गाने आले असतीलही, पण ते चांगले काम करत आहेत. त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेत आहोत, जिथे शेतकऱ्यांनाच ठरवावे लागणार आहे. शेतकरी मारेकऱ्यांना तर नक्कीच कामावर ठेवणार नाहीत”, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
शेती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कामगारांना अमेरिकेत राहता यावे, यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून त्यांना तात्पुरता पास देण्याची योजना ट्रम्प यांनी जाहीर केली. तसेच गृह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. अवैध स्थलांतरितांवर कडक कारवाई होत असल्यामुळे अमेरिकेतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अनुभवी मजुरांना देशाबाहेर जावे लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी सदर योजना जाहीर करण्यात आल्याची माहिती ट्रम्प यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
शेतकऱ्यांप्रती काळजी व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला दोन्ही बाजूंची काळजी आहे. इमिग्रेशनबाबत कडक धोरण घेण्यासाठी मी मागेपुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांप्रतीही मला कळवळा आहे. तसेच हॉटेल क्षेत्राचीही मला काळजी आहे. या क्षेत्रात काम करणारे लोक विशिष्ट प्रकारची कौशल्ये जपून असतात.
काय आहे तात्पुरती पास योजना
डोनाल्ड ट्रम्प म्हमाले की, आता शेतात आणि हॉटेल्सवर अवैध कामगार शोधण्यासाठी छापेमारी केली जाणार नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरितांसाठी तात्पुरती पास देण्याची योजना जाहीर केली जाईल. यामुळे या क्षेत्रातील कामगारांना कायदेशीररित्या काम करण्याची परवानगी मिळेल. मात्र यामुळे नागरिकत्वाचा मार्ग मोकळा होणार नाही.
अमेरिकेतील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने (ICE) ने उद्योगांच्या तक्रारींना जाणून घेतल्यानंतर कृषी आणि हॉटेल क्षेत्रावरील कारवाई स्थगित केली होती. या दोन क्षेत्रावरील कारवाई थांबली असली तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना थार दिला जाणार नाही, असेही जाहीर करण्यात आले आहे.