नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षे देशातील असंख्य ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचा सोमवारी संसद सदस्यांनी निरोप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध पक्षांच्या सदस्यांनी, लोकसभाध्यक्ष व राज्यसभेच्या सभापतींनी लोकशाही परंपरांना- संसदेतील कडुगोड आठवणींना उजाळा दिला. ‘स्वातंत्र्य प्राप्तीच्या मध्यरात्री पंडित नेहरूंनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा प्रतिध्वनी इथे आजही ऐकू येतो’, अशा शब्दांत मोदींनी भावना व्यक्त केल्या. संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा करण्यात आली. ही प्रदीर्घ चर्चा जुन्या संसद भवनाच्या सभागृहांमधील अखेरचे कामकाज होते. विशेष अधिवेशनाचे उर्वरित चार दिवसांचे कामकाज मंगळवारपासून नव्या इमारतीमध्ये होईल. ‘अनेक वर्षे राहिलेले घर सोडून जाताना कुटुंब जसे भावूक होते तसेच, आपणही या सदनाचा निरोप घेताना सद्गदित झालो आहोत. या संसद भवनात आपण सगळे कुटुंब म्हणून वावरलो. आपल्यामध्ये मतभेद झाले असतील, वाद झाले असतील पण, संघर्षांच्या काळात आपण एकत्र येऊन लढलो आणि यशस्वीही झालो. सभागृहामध्ये एकमेकांविरोधात भूमिका घेतली असेल पण, सदनाबाहेर आपल्यामध्ये कधीही कटुता आली नाही. हेच देशाच्या लोकशाहीचे सामथ्र्य आहे’, असे मोदी लोकसभेतील भाषणात म्हणाले. हेही वाचा >>>विधानसभाध्यक्षांवर ताशेरे; आमदार अपात्रतेच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले संसदेच्या प्रवासावरील एकदिवसीय चर्चेची सुरुवात लोकसभेत मोदींनी केली. त्यांनी पं. नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत माजी पंतप्रधानांच्या निर्णयांचा, त्यांच्या योगदानाचा आवर्जुन उल्लेख केला. लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव (ग.वा.) मावळणकरांपासून सुमित्रा महाजन यांच्या लोकसभाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत आदर व्यक्त केला. मावळणकर यांनी नियम समिती, विशेषाधिकार समिती अशा अनेक समित्यांची स्थापना करून संसदेच्या कारभाराला दिशा दिली. मावळणकरांनंतर हीच परंपरा इतर १६ लोकसभाध्यक्षांनी कायम ठेवली, असे सांगत मोदींनी गेल्या नऊ वर्षांच्या स्वत:च्या पंतप्रधान पदाच्या काळात घेतल्या गेलेल्या वादग्रस्त निर्णयांचाही उल्लेख ‘ऐतिहासिक’ असा केला! कित्येक वर्षे प्रलंबित असलेले पण, अनुच्छेद ३७०, जीएसटी, एक पद- एक निवृत्तीवेतन, आर्थिक दुर्बलांना आरक्षण आदी निर्णय आपल्या नेतृत्वाखाली घेतले गेल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी तासाभराच्या भाषणामध्ये आणीबाणीसारख्या निर्णयांचा उल्लेख करत विरोधकांना चिमटेही काढले. या संसदेने लालबहादूर शास्त्रींच्या काळात १९६५चे पाकिस्तानविरोधातील युद्धही पाहिले. इंदिरा गांधींच्या काळात बांगलादेश मुक्तीचा संग्राम पाहिला. पण, याच संसदेने इंदिरा गांधींनी केलेला लोकशाहीवरील हल्लाही अनुभवला. देशावर आणीबाणी लादली गेली पण, कालांतराने लोकशाही अधिक मजबूत होऊन परत आली. मनमोहन सिंग यांच्या काळात मतांसाठी लाच घेण्याचा लोकशाहीला काळीमा फासणारा घृणास्पद प्रकारही पाहिलेला आहे. अशा अनेक बऱ्यावाईट घटनांतून संसदेने मार्गक्रमण केल्याची आठवण मोदींनी करून दिली. हेही वाचा >>>नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा नवनिर्माणाशी संबंधित अनेक घटनांचे हे संसद भवन साक्षी आहे. २ वर्षे ११ महिने संविधानसभेच्या बैठकांनंतर आपण संविधान स्वीकारले, ते आत्तापर्यंत मार्गदर्शक राहिले आहे. ७५ वर्षे सामान्य लोकांचा संसदेवरील विश्वास वाढत गेला हीच लोकशाहीची मोठी ताकद आहे. इथेच पं. नेहरू, शास्त्री, वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी सदनाचे नेतृत्व केले. देशाला दिशा दिली. पटेल, लोहिया, चंद्रशेखर, अडवाणी या नेत्यांनी संसदेला समृद्ध केले. पंतप्रधान पदावर असताना नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला, तेव्हा या सदनातील प्रत्येकाच्या डोळय़ात अश्रू वाहिले, असे मोदी म्हणाले. पं. नेहरूंनी मंत्रिपरिषदेत डॉ. आंबेडकरांचा तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा समावेश केला, असा उल्लेख मोदींनी आवर्जुन केला. लोकशाहीमुळेच माझ्यासारखा सामान्य माणूस पंतप्रधान -मोदी देशातील समृद्ध लोकशाहीमुळे रेल्वे फलाटावर राहणारा माझ्यासारखा सामान्य माणूस पंतप्रधान बनू शकला. मी पहिल्यांदा लोकसभेत आलो तेव्हा पायऱ्यांवर डोके टेकले होते. तेव्हा जितका मी भावूक झालो तेवढाच आताही झालो आहे. काळाच्या ओघात संसदेचे रूपही पालटले आहे, दोन्ही सभागृहांत मिळून ६०० महिला खासदारांचे योगदान मिळाले आहे, असे गौरवोद्गार मोदींनी काढले. हेही वाचा >>>“हात जोडून कळकळीची विनंती, मोदींची इच्छा पूर्ण करा”, सुप्रिया सुळेंकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी खरगेंची टीका संसदेत मजबूत विरोधक नसणे योग्य नव्हे असे पं. नेहरू नेहमी म्हणत. पण, आता विरोधकांना कमजोर करण्याचे काम केले जात असून त्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला जातो. मग, वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केली. संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावरील चर्चवेळी खरगेंनी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नाही. आमच्या समोरील माइक बंद होतो. आम्ही (विरोधक) बोलत असताना कॅमेरा दुसरीकडे वळवला जातो. माझी थोडी जरी चूक झाली तरी तुम्ही शिक्षा करता, पण, भाजपच्या सदस्यांनी मोठी चूक केली तर तुम्ही त्यांना माफ करता. तुम्ही कारभारात संतुलन आणले पाहिजे, असे खरगे म्हणाले.