आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचा स्वत: अनुभव घेतला. येत्या काही महिन्यांत देशभरातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. 4G पेक्षा तब्बल १० पट अधिक वेगवान सेवा देणाऱ्या 5G सुविधेमुळे सर्वच क्षेत्रातील ऑनलाईन व्यवहार अधिक वेगाने होऊ शकणार आहेत. मात्र, आजच्या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला तो मोदींना देण्यात आलेला 5G सेवेचा डेमो! देशातील अग्रगण्य उद्योगपती आणि अतीश्रीमंतांच्या यादीच अव्वल असणारे मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांनी मोदींना या सेवेचं प्रात्याक्षिक दिलं. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

१३ शहरांपासून सुरुवात

देशभरातील १३ मोठ्या शहरांपासून या सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यापैकी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या देशाच्या चार मेगासिटीजमध्ये सर्वात आधी 5G सेवा नागरिकांना वापरता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अंबानी पिता-पुत्रांनी दिला डेमो!

मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी प्रगती मैदान येथे मोदींना ही 5G सेवा नेमकी कशी काम करते? त्याचे फायदे काय? कोणत्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये याचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल? यासंदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. व्हिडीओमध्ये आकाश अंबानी मोदींना या सर्व गोष्टी समजावून सांगताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय, त्यांच्यापाठोपाठ खुद्द मुकेश अंबानी हेदेखील मोदींसोबत प्रदर्शनात फिरत असल्याचं दिसून आलं.