China Rare Earth Export Ban : चीनने मौल्यवान धातूंच्या निर्यातीवर बंदी घातल्याने त्याचा थेट परिणाम जगभरातील वाहन उद्योगावर होत असल्याचं दिसून येत आहे. जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या ‘सुझुकी’ने तिच्या लोकप्रिय ‘स्विफ्ट’ कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या निर्यात निर्बंधांमुळे प्रभावित होणारी ही जपानमधील पहिली वाहन उत्पादक कंपनी आहे. दरम्यान, ‘सुझुकी’ने अचानक स्विफ्टचे उत्पादन थांबविल्याने या सर्वांचा वाहन उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम होणार, ते जाणून घेऊ…

रॉयटर्सच्या अहवालानुसार, दुर्मीळ खनिज संयुगाच्या कमतरतेचे कारण देत कंपनीने स्विफ्ट स्पोर्टस ही कार वगळता इतर प्रकारातील सर्व वाहनांचे उत्पादन २६ मेपासून थांबविले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे नियोजन अनेकदा पुढे ढकलले आहे. चीनकडून आवश्यक घटकांचा पुरवठा सुरळीत झाल्यास येत्या १३ जूनपासून उत्पादन अंशतः पुन्हा सुरू होईल. त्याचबरोबर १६ जूननंतर ‘स्विफ्ट’चे उत्पादन पूर्णपणे सुरू होईल, असं सुझुकीने एका अधिकृत निवेदनात सांगितलं आहे.

‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’वर चीनचे निर्बंध

चीनने ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ (दुर्मीळ खनिज संयुग) आणि संबंधित साहित्यांवर ४ एप्रिलपासून निर्बंध लागू केले होते. अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त आयातशुल्काला प्रत्युत्तर म्हणून हे निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचा परिणाम आता जगभरातील वाहन उत्पादक कंपन्यांवर होऊ लागला आहे, ज्यामध्ये भारतामधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील सुझुकीची उपकंपनी मारुतीने या आठवड्यात सांगितले की, सध्या तरी चीनच्या रेअर अर्थ मॅग्नेट्सवरील निर्बंधांचा तत्काळ परिणाम जाणवत नाही. उद्योग क्षेत्र याबाबत भारत सरकारबरोबर चर्चा करीत असून त्यांचा प्रतिसाद सकारात्मक व सहकार्यपूर्ण आहे.

आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांच्यातील संघर्षाचा जगावर काय होणार परिणाम?

चीनच्या निर्बंधामुळे वाहनांच्या किंमती वाढणार?

  • चीनने लागू केलेल्या या निर्बंधांचा इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादकांवरही मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.
  • देशातील प्रमुख वाहन उत्पादन कंपन्यांना महत्त्वाच्या घटकांची संभाव्य टंचाई भासण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पादनात विलंब आणि वाहनांच्या किमतीतही वाढ होण्याची संकटे निर्माण झाली आहे.
  • सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा चांगला खप सुरू असून त्यांच्या किमतीही आटोक्यात असल्याचं दिसून येत आहे.
  • भारतीय वाहन उद्योगाने बीजिंगहून ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारबरोबर संवाद सुरू केला आहे.
suzuki swift car photo

‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’ का महत्त्वाचे आहेत?

चिनी सरकारने या मॅग्नेट्सच्या निर्यातीवर संपूर्ण बंदी घातलेली नसली तरी, दुर्मीळ खनिज संयुगाचा पुरवठा लांबणीवर पडत असल्याने कारच्या उत्पादनांची टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी रेअर अर्थ मॅग्नेट्स, विशेषतः निओडिमियम-आयर्न-बोरोन मॅग्नेट्स अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे मॅग्नेट्स इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आवश्यक असलेल्या शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रासाठी वापरले जातात, जे वाहनाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. इलेक्ट्रिक वाहनातील फक्त मोटरमध्येच नाही तर इतर अनेक प्रणालींमध्येही हे मॅग्नेट्स वापरले जातात, ज्यामध्ये पॉवर स्टीयरिंग सिस्टम, वायपर मोटर्स, ब्रेकिंग सिस्टम आणि स्मार्ट सेन्सर यंत्रणेचा समावेश होतो.

चीनने नेमकी कोणती अट घातली?

चीनचा या रेअर अर्थ मॅग्नेट्सवर जवळपास एकाधिकार आहे, ज्यामुळे जागतिक पुरवठा त्यांच्यावरच अवलंबून आहे. भारतीय वाहन उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, रेअर अर्थ मॅग्नेट्सची चीनमधून आयात करताना आता भारतीय आयातदारांना एक लेखी हमी द्यावी लागत आहे. ती म्हणजे, आयात केलेले मॅग्नेट्स फक्त वाहने तयार करण्यासाठीच वापरले जातील, संरक्षण किंवा लष्करी वापरासाठी नाही. गेल्या काही आठवड्यांत भारतीय कार उत्पादक कंपन्यांनी साठवलेले मॅग्नेट्स वापरून टाकले आहेत, यामुळे पुढील काळात त्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने आता नवीन अट घातली आहे की, कार उत्पादकांनी स्वतंत्र मॅग्नेट्स खरेदी न करता, संपूर्ण इलेक्ट्रिक मोटर असेंब्लीजच खरेदी कराव्यात. ते शक्य नसल्यास स्थानीय रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादकांना निर्यात परवाने मिळेपर्यंत वाट पाहावी.

चीनच्या निर्बंधांमुळे वाहन उद्योग संकटात

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बीजिंगने अलीकडे चार मॅग्नेट उत्पादकांना निर्यात परवाने मंजूर केले आहेत, ज्यामध्ये फोक्सवॅगनसाठी काम करणाऱ्या पुरवठादारांचाही समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’वर चीनने घातलेल्या नव्या निर्बंधांमुळे आता वाहन उत्पादक कंपन्यांना संपूर्ण इलेक्ट्रिक मोटर असेंब्ली आयात करण्याचा विचार करावा लागत आहे. मात्र, यामुळे वाहन रचना पुन्हा डिझाइन करावी लागणार असल्याने उद्योग जगत चिंतेत आहे. पूर्वी फक्त मॅग्नेट्स आयात करून कंपन्या मोटरचा आकार आपापल्या वाहनांच्या डिझाइननुसार तयार करीत होत्या. मात्र, आता संपूर्ण मोटर आयात केल्यास त्यांचा ठराविक आकार असल्याने वाहनांची अंतर्गत रचना बदलावी लागेल.

चीनच्या धोरणाचा भारत-अमेरिकेला फटका

जपानने अलीकडच्या काळात सरकारी धोरणांमुळे खनिज प्रक्रिया उद्योग पुन्हा सुरू केला असला, तरी अमेरिका व भारत यांसारखे देश अजूनही या धातूंसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अमेरिकेने चीनवर आयात शुल्क लावल्याच्या प्रतिसादात, चीनने सात जड रेअर अर्थ धातूंच्या (जसे की सॅमेरियम, गॅडोलिनियम, टरबियम, डिस्प्रोसियम, लुटेशियम, स्कँडियम आणि इट्रियम) आणि रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. याआधीही चीनने अमेरिकेला गॅलियम, जर्मेनियम, अँटिमनी आणि इतर लष्करी वापरासाठी संभाव्य असलेल्या अत्याधुनिक धातूंच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

हेही वाचा : ईद साजरी करण्यावर बंदी; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिमांविरोधात फतवा, प्रकरण काय?

दरम्यान, अमेरिका-चीन व्यापारविषयक चर्चांमध्ये अलीकडे काही सकारात्मक हालचाली झाल्या असल्या, तरी या घटकांचा पुरवठा सुरळीत होईल का, यावर अजूनही अनिश्चितता आहे. वाहन उद्योगाला ‘मॅग्नेट्स’ऐवजी संपूर्ण मोटर आयात करावी लागल्यास खर्च, वेळ आणि डिझाइनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या निर्बंधांमुळे जागतिक वाहन उद्योग विशेषतः इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे शिष्टमंडळ चीनला जाणार

दरम्यान, चीनने ‘रेअर अर्थ मॅग्नेट्स’वर निर्बंध लादल्यामुळे भारत पुढील आठवड्यात ऑटो उद्योगाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ चीनला पाठवणार आहे. या शिष्टमंडळात सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (अ‍ॅक्मा) प्रतिनिधी असणार आहेत. ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी आवश्यक असलेल्या दुर्मीळ पृथ्वीच्या साहित्याच्या शिपमेंटला जलद मंजुरी देण्यासाठी हे शिष्टमंडळ चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. दुसरीकडे ही समस्या सोडविण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय बीजिंगमधील भारतीय दूतावासाद्वारे पुरवठ्याच्या समस्या सोडवित आहेत.