scorecardresearch

Premium

विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाचे महत्त्व काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यावर तो का साजरा होतोय?

नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली.

Indian Navy Day presence Prime Minister Narendra Modi celebrated fort Chhatrapati Shivaji Maharaj
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाचे महत्त्व काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यावर तो का साजरा होतोय? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत मराठ्यांचे आरमार उभारून आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता, त्या कोकण भूमीत चार डिसेंबर रोजी भारतीय नौदलाच्या वतीने नौदल दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४३ फूट पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्त नौदलाच्या सामरिक सामर्थ्याचे दर्शन घडणार आहे.

नौदल दिनाची प्रेरणा काय?

भारतीय नौदल दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा करते. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला होता. या युद्धात भारतीय नौदलाने आखलेली ट्रायडेंट मोहीम अतिशय महत्त्वाची ठरली. भारतीय युद्धनौकांनी थेट कराची बंदरावर हल्ला चढविला. ज्यात पहिल्यांदा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर झाला. अनेक पाकिस्तानी युद्धनौकांना जलसमाधी दिली. त्यांचे तेलसाठे उद्ध्वस्त झाले. कराची बंदर काही दिवस आगीच्या वेढ्यात सापडले होते. या प्रहाराने पाकिस्तान नौदल पुरते गारद झाले. त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले. त्या युद्धावर भारतीय नौदलाच्या कारवाईचा सामरिक प्रभाव पडला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नौदल इतिहासात ही सर्वाधिक प्रभावी कारवाई मानली जाते, ज्यात भारतीय सैन्याचे कुठलेही नुकसान झाले नाही. या विजयाचे स्मरण हीच नौदल दिनाची प्रेरणा आहे.

Police Commissioners vehicle vandalized in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांचे वाहन फोडले
sudhir manguttiwar
छत्रपतींच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून घोषित; सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यावरून घोषणा
Shaurya Day is celebrated in the fort of Shirala where the liberation of Chhatrapati Sambhaji Raje was attempted
छत्रपती संभाजीराजेंच्या मुक्ततेचा प्रयत्न झालेल्या शिराळ्याच्या किल्ल्यात शौर्यदिन साजरा
Pigeon
हेरगिरीचा आरोप असलेल्या कबुतराची आठ महिन्यांनी सुटका; जाणून घ्या युद्धातील प्राण्यांच्या वापराचा इतिहास!

सैन्य कारवाईचे धोरण कसे बदलले ?

लष्करी कारवाईत सरकारचे धोरण कधीकधी अडसर ठरते. भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीत आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा ओलांडणार नाही, या सरकारच्या धोरणाने सैन्याची रणनीती सीमेपर्यंतच मर्यादित राहिल्याचे काही लष्करी तज्ज्ञ मानायचे. भारतीय सैन्याचे प्रशिक्षणही मग त्या आधारे होते, हा दाखला त्यांच्याकडून दिला जात असे. पाकिस्तानशी १९६५ मध्ये झालेल्या युद्धात सरकारच्या धोरणामुळे नौदलास बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागला होता. ती कसर १९७१ च्या युद्धात भरून निघाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून संमती घेत ॲडमिरल एस. एम. नंदा यांनी ट्रायडेंट मोहीम आखली. आक्रमक धोरण स्वीकारून भारतीय युद्धनौकांनी कराचीवर हल्ला केला. दुसरीकडे भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात शिरून पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली. या युद्धात सरकारच्या धोरणात बदल झाल्याचे अधोरेखित झाले.

सिंधुदुर्गची निवड का झाली?

भारतीय आरमार उभारणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग येथे साजरा होत आहे. यासाठी नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली. सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो. शिवछत्रपतींनी पायदळ व घोडदळाप्रमाणे मराठ्यांचे आरमार सुसज्ज करत स्वराज्य बळकट केले. सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे अनेक जलदुर्ग उभारले. त्यांची उभारणी करताना शत्रूची जहाजे जलदुर्गाजवळ येण्यापूर्वीच क्षतिग्रस्त होतील, याची चोख व्यवस्था केली. जहाज बांधणीचे काम समांतरपणे हाती घेतले. गलबते, तोफा ठेवता येईल, असे गुराब त्यांच्या आरमाराचा भाग होते. सैनिकांची वाहतूक करण्यासाठी तरांडी तर माल वाहतुकीसाठी शिबाड जहाज वापरली गेल्याचे उल्लेख आहेत. सुमारे ४०० जहाजांच्या बळावर महाराजांनी कारवारपर्यंतचा कोकण किनारा आपल्या आधिपत्याखाली आणला.

नौदलाचा आधुनिकतेकडे प्रवास कसा होत आहे?

देशाला पूर्व व पश्चिमेकडे विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. देशाच्या सागरी सीमांबरोबर राष्ट्रीय सागरी हिताच्या रक्षणाची मुख्य जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. हिंद महासागर क्षेत्रात प्रमुख व्यापारी मार्ग असून तिथून तब्बल सव्वा लाख जहाजे प्रवास करतात. व्यापारी मार्गाची सुरक्षा, आपत्कालीन संकटावेळी नौदल मदत पुरवते. नौदलाच्या ताफ्यात सध्या १३२ हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या असून पुढील पाच वर्षांत त्यांची संख्या २०० वर नेण्याचे लक्ष्य आहे. सध्या दलाच्या भात्यात १४३ विमाने आणि १३० हेलिकॉप्टर आहेत. देशात ४३ जहाजे व पाणबुड्यांची बांधणी प्रगतीपथावर आहे. स्वदेशी बनावटीची ५१ जहाजे, सहा पाणबुड्या व नौदलास उपयुक्त ठरणाऱ्या १११ हेलिकॉप्टरच्या बांधणीला मान्यता मिळाली आहे. नौदलाकडे सद्यःस्थितीत रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी आयएनएस विक्रांत या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. सागरी क्षेत्रावर प्रभुत्व राखण्यासाठी तिसऱ्या युद्धनौकेचाही विचार होत आहे. सुदूर सागरात (ब्लू वॉटर) कारवाईची क्षमता विस्तारली जात आहे.

नौदलाचे सामर्थ्य कसे अधोरेखित होणार?

नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले जाते. यंदाच्या सोहळ्यात आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहूू नौका सहभागी होणार आहे. तसेच आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस चेन्नई, आयएनएस ब्रह्मपुत्रा अशा सुमारे २० युद्धनौका, विनाशिका, मिग २९ के, हॉक, सीकिंग ४२ बी, एलसीए ही ४० विमाने, चेतक, एएलएच ध्रुव, कामोव्ह व बहउद्देशीय एमएच – ६० रोमिओ या हेलिकॉप्टचर्सचा ताफा असणार आहे. युद्धनौका व विमानांची प्रात्यक्षिके, नौदल बँड, राष्ट्रीय छात्र सेना पथकाचे (एनसीसी) हॉर्न पाईप नृत्य, सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो हे कार्यक्रम होत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the significance of navy day in the presence of prime minister narendra modi why is it celebrated at the fort built by chhatrapati shivaji maharaj print exp dvr

First published on: 04-12-2023 at 08:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×