आपल्या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद देणे तर दूरच, पण ‘गाढवा, म्हसोबा, नालायक, छडीने फोडून काढीन, तुम्हाला फटके दिले पाहिजेत,’ अशी कडक भाषा वापरणे शिक्षकांसाठी अडचणीचे ठरू शकते. पुण्यातील इंगजी माध्यमाच्या शाळेतील एका विद्यार्थ्यांला (मुलाची ओळख पटू नये, यासाठी त्याच्या व शाळेच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.) त्याच्या शिक्षकांनी वापरलेली शिवराळ भाषा त्यांच्या अंगाशी आली असून या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे शिक्षक व शाळेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
या विद्यार्थ्यांला ‘तुझी चड्डी काढून टाकीन, हा माणूस आहे की जनावर’ अशा स्वरूपाची वक्तव्ये त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केली. त्याला फरपटत ओढून मुख्याध्यापकांकडे नेले. या शेरेबाजीमुळे आणि वर्तणुकीमुळे आपल्या मुलाच्या बालमनावर परिणाम झाला आहे. त्याच्या मानसिक धक्का बसला आहे, अशी तक्रार त्याच्या पालकांनी आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आयोगाने संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा प्रशासन, राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आदींना नोटीसा पाठवल्या. त्यावर आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी त्रिपाठी यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.
पालकांच्या या पवित्र्यामुळे शाळा प्रशासन जागे झाले आहे. त्याचबरोबर पालकांनाही शाळा बदलायची इच्छा नाही. त्यामुळे हे प्रकरण तडजोडीने मिटण्याची चिन्हे आहेत. मात्र
समस्त शिक्षक परिवारासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, हे या घटनेवरून दिसून येते.