राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने IPL मधील आपला सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. करोनाच्या तडाख्यामुळे यंदाचे IPL लांबणीवर पडले आहे. साऱ्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचे IPL आणि स्पर्धेचा १२ वर्षाचा प्रवास याबाबत शेन वॉर्न याने इन्स्टाग्राम लाईव्हवरून मत व्यक्त केले. यावेळी त्याने त्याला आवडणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा IPL संघदेखील जाहीर केला. पण विशेष म्हणजे त्यात त्याने सचिन तेंडुलकरचा समावेश न केल्याने काहींच्या भुवया उंचावल्या आहेत.
वॉर्न इन्स्टाग्राम लाईव्ह करताना म्हणाला, “मला २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी प्रशिक्षक म्हणूनही काम केले. आमच्या संघात बरेच गुणवान खेळाडू होते. मी खेळत असताना मी त्यांना खूप काही शिकवले. माझ्या कालावधीत (२००८-२०११) मी पाहिलेल्या खेळाडूंमधून मी माझा संघ निवडला आहे.” वॉर्नने आपल्या संघात ३ वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. तसेच त्याने संघात ६ फलंदाजांचा समावेश केला आहे. या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय आर्श्चयाची दुसरी बाब म्हणजे त्यात त्याने गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदीची निवड केली आहे. सिद्धार्थने ‘आयपीएल’च्या पहिल्या सत्रात सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे कदाचित निवड केली असावी.
असा आहे संघ –
फलंदाज – रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग
यष्टीरक्षक – महेंद्रसिंग धोनी
अष्टपैलू – यूसुफ पठान, रविंद्र जाडेजा
गोलंदाज – हरभजन सिंग, जहीर खान, सिद्धार्थ त्रिवेदी, मुनाफ पटेल
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2020 12:11 pm