IND vs ENG 2nd Test Practice Session Video: टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल. यासह इंग्लंड कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. दरम्यान बर्मिंगहम कसोटीपूर्वी भारताचा गोलंदाज संघाच्या सराव सत्रात नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. बीसीसीआयने याचा व्हीडिओ शेअर केला आहे.
२ जुलैपासून भारत वि. इंग्लंड बर्मिंगहम कसोटी सामना सुरू होणार आहे. यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये जोरदार तयारी करत आहे. दरम्यान आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्सचा भाग असलेला खेळाडू हरप्रीत ब्रार इंग्लंडमध्ये भारताच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. शुबमन गिलने मेसेज करून त्याला बोलवल्याचं त्याने सांगितलं आहे.
२८ जूनच्या सराव सत्रात हरप्रीत ब्रार भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसला. तो अनधिकृत प्रशिक्षण सत्रात उपस्थित होता. तो फक्त सरावासाठी संघाशी जोडला गेला होता. बीसीसीआयने संघाच्या सराव सत्राचा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये हरप्रीत ब्रार आणि चंदीगढकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणारा जगजीत सिंग संधू असे दोन खेळाडू यामध्ये दिसत आहेत.
हरप्रीत ब्रारने या व्हीडिओमध्ये सांगितलं की, “माझी पत्नी इथेच स्विंडनमधील आहे. बर्मिंगहमपासून हे ठिकाण एक दीड तासाच्या अंतरावर आहे. माझं शुबमनशी बोलणं झालं होतं, त्याचा काल मेसेज आला होता, मग मी पण आलो म्हटलं संघाबरोबर सराव करू.”
हरप्रीत ब्रारसह जगजीत सिंग संधूही सराव सत्रात उपस्थित होता. तो भारतीय कसोटी संघाचा भाग असलेल्या अनेक क्रिकेटपटूंसह क्रिकेट खेळला आहे. ज्यामध्ये अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, शुबमन गिल, आकाशदीप या खेळाडूंचा समावेश आहे. जगजीत सिंग बर्मिंगहममध्ये क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघ सराव करत असल्याचे कळलं, मग तो टीम इंडियाला सराव सत्रात नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पोहोचल्याचं त्याने व्हीडिओमध्ये सांगितलं आहे.
जगजीत सिंग कोणाकोणाबरोबर क्रिकेट खेळला हे सांगताना म्हणाला, “ऋषभ पंत मी अंडर-१९ झोन वनडे एकत्र खेळलो आहे. शुमबन गिलचा जेव्हा अंडर-१९ चा पहिला सीझन होता, तेव्हा माझा शेवटचा सीन होता. आकाशदीपबरोबर मी दुलीप ट्रॉफी खेळलो आहे. वॉशिंग्टन सुंदरसह अंडर-१९ झोनचे सामने खेळलो. अर्शदीप माझा ज्युनियर आहे, जेव्हा मी १९ वर्षांचा होतो, तो १६ वर्षांचा होता. मी तेव्हा त्याला सांगायचो बॉल कसा टाकणार, रनअप कसा घेतात.” अर्शदीपनेही त्याच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतल्याचं व्हीडिओमध्ये सांगितलं आहे.