Smriti Mandhana smashes maiden T20I century against England : भारत आणि इंग्लंड महिला संघांतील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आज, शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील या टी२० क्रिकेट सामन्यात तिने अवघ्या ५१ चेंडूत शतक झळकावले आहे. याबरोबरच ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक साकारणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला फलंदाजाने केलेले हे दुसरेच शतक आहे. याआधी हरमनप्रीत कौरने २०१८ मध्ये शतकी खेळी साकारली होती.
दरम्यान डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मानधनाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत इंग्लिश गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. पावरप्लेचा पुरेपूर फायदा करून घेत तिने आक्रमक खेळ दाखवला. तिने तिच्या डावाची सुरूवातच एक चौकार लगावून केली आणि पुढे फलंदाजीची हीच गती कायम राखली.
ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या या टी२० सामन्यात कर्णधार मानधनाने ६२ चेंडूत ११२ धावा केल्या. ही धावसंख्या टी२० सामन्यात भारतीय महिला खेळाडूने आजवर केलेले सर्वाधिक धावसंख्या आहे. या खेळीत तिने १५ चौकार आणि तीन षटकार लगावले. मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ५ गडी गमावून २१० धावा उभारल्या.
मानधनाचे हे १४ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. तिने यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ शतक नावावर केले आहेत, हे भारतीय खेळाडूसाठी एक रेकॉर्ड आहे. तर तिच्या नावावर कसोटीत दोन शतके आहेत.
इंग्लंडविरोधात सर्वाधिक ५० हून अधिक धावा
या खेळीदरम्यान मानधनाने ५० धावांचा टप्पा ओलांडताच टी२० क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरोधात सर्वाधिक वेळा ५०प्लस धावा करण्याच्या बेथ मूनीच्या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथच्या नावावर इंग्लंडविरोधात ८ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे, आता मानधना देखील तिच्या बरोबरीला पोहचली आहे.
या सामन्यात मानधना आणि शफाली यांनी मिळून अजून एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या दोघींनी ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलीसा हेली आणि बेथ मूनी यांच्या नाववर असलेला वीस ५०प्लस भागिदारी रचण्याचा विक्रम मोडला आहे. आता हा विक्रम मानधना आणि शफाली यांच्या नावावर आहे.