News Flash

दुसरी बाजू..

शस्त्रहीन जो समाज होता शांत, अहेतुक, अगतिक होता

| September 15, 2013 01:01 am

शस्त्रहीन जो समाज होता
शांत, अहेतुक, अगतिक होता
वृद्धही होते, मुलेही होती
वृद्धा होत्या, होत्या युवती
त्यांची कत्तल करतां ज्यांचे मन द्रवले नाही
त्या अधमांच्या मर्दुमकीला जगी तोड नाही
अवचित शस्त्रे घुमू लागली
चहूबाजूंनी आग बरसली
माथ्यावर आभाळ फाटले
मृत्यूचे थैमान चालले
रक्ताने निथळल्या जयांनी सुन्न दिशा दाही
त्या अधमांच्या मर्दुमकीला जगी तोड नाही..
या ओळी तब्बल ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेतील आहेत. तिचे प्रेरणास्थान होते अमृतसरच्या जालियनवाला बागेतील क्रूर, भीषण हत्याकांड. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मुद्रेवरील उदार न्यायप्रीतीचा, सुसंस्कृततेचा नकली मुखवटा त्या एका कृत्याने पार चिंध्या चिंध्या होऊन धुळीला मिळाला. त्या नरसंहारातून ज्या थोडय़ा व्यक्ती वाचल्या असतील त्यामध्ये एक १२-१३ वर्षांचा मुलगा होता. त्याने ते अमानुष हत्याकांड उघडय़ा डोळ्यांनी साक्षात् अनुभवलं आणि त्यामुळे त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट त्या एका क्षणात जणू निश्चित झालं. वयात येताच हरप्रयत्नानं त्यानं इंग्लंड गाठलं.. आणि अचूक संधी साधून मनातल्या कोंडलेल्या संतापाला वाट करून दिली. एका जाहीर समारंभात जालियनवाला बागेतील हत्याकांडाची ऑर्डर देणाऱ्या निवृत्त गव्हर्नर मायकेल ओडवायरची हत्या करून त्यानं स्वत:ला अटक करून घेतली आणि फासावर चढून आपली आत्माहुती दिली. त्याचं नाव होतं- उधमसिंग. तेव्हा त्याचं वय केवळ १८ वर्षांचं होतं. आपलं नियोजित कर्तव्य पार पाडल्यानंतरची एक उन्मनी तृप्ती प्रतिबिंबित झालेली त्याची मुद्रा दाखवणारं तेव्हाचं त्याचं एक छायाचित्र मी पाहिलं होतं, ते याक्षणीही माझ्या नजरेसमोर आहे. साहजिकच या विषयातली माझी मनोवस्था स्वतंत्रते भगवती’मधील या कवितेत खूप तीव्रपणे व्यक्त झालेली दिसते. पुढे रीचर्ड अ‍ॅटनबरोच्या गांधी’ या चित्रपटात चित्रित झालेला जालियनवाला बागेचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग पाहिला आणि उधमसिंगच्या मनात उठलेला आगडोंब अंशत: तरी अनुभवायला मिळाला. हा उधमसिंग आणि कर्झन वायलीला मृत्युदंड देणारा मदनलाल धिंग्रा या दोघांना जिथं फाशी दिलं तो तुरुंगही मी नुकताच माझ्या लंडनभेटीत पाहून आलो आहे. या सगळ्या काळात माझ्या मनात एक प्रश्न सुप्त स्वरूपात वारंवार उभा राहायचा. उधमसिंगने लंडनला जाऊन मायकेल ओडवायरची हत्या करून आपला प्रतिशोध घेतला, पण ते अमानुष कृत्य प्रत्यक्षात निर्दयपणे बजावणारा जनरल डायर मात्र तत्कालीन सशस्त्र जहाल क्रांतिकारक संघटनांच्या सापळ्यातून कसा बचावला असेल? कुठे गेला असेल तो?
अगदी अलीकडेच, म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वी ब्रिटिश लायब्ररीत एक सुंदर पुस्तक हाती आलं. जनरल डायरचं जीवनचरित्र. या पुस्तकानं त्या इतिहासावर एक वेगळाच प्रकाश टाकला. एकतर इतिहासविषयक लेखन करणाऱ्या या परदेशी लेखकांचा एक विशेष मला लक्षणीय वाटतो. तो म्हणजे त्यांची या लेखनातली नि:पक्षपाती तटस्थता! पूर्वग्रह आणि भावविवशता या दोषांना थारा न देता विश्लेषक नजरेनं जे दिसतं, जाणवतं, ते ही मंडळी फार थेटपणे मांडतात. त्यादृष्टीने या पुस्तकाचे शीर्षकच फार वेधक आहे- kThe Butcher of Amrutsarl… अमृतसरचा खाटिक.’ पुस्तकावरचं जनरल डायरचं छायाचित्र एक रेखीव आणि सौम्य मुद्रा असलेला सेनाधिकारी म्हणून त्याची ओळख करून देतं. आणि पुस्तकाच्या आत आपादमस्तक शस्त्रसज्ज होऊन कामगिरीवर निघालेला जनरल डायर आपल्याला एका छायाचित्रात दिसतो. त्यावेळचा त्याचा एक उद्गार खाली छापलेला आहे.. ”Now I am going to execute a Dirty Job.”
जनरल डायरचा या घटनेआधीचा जीवनपट थोडक्यात सांगावा लागेल. त्याचं बालपण फारसं सुखाचं नव्हतं. तो खूप एकलकोंडा, मुखदुर्बळ होता. भरीला वाचादोष. त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या आयुष्याला व्यापून राहिला होता. म्हणूनच कदाचित त्यानं सैन्यात प्रवेश घेतला असावा. इथपासून त्याचं व्यक्तिमत्त्व पालटत गेलं. एक कणखर सेनानी म्हणून तो ओळखला जाऊ लागला. अनेक कठीण मोहिमा त्यानं यशस्वी केल्या. जिथे आणीबाणी.. तिथं डायर’ अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली आणि त्यातूनच ब्रिटिश राजसत्तेने त्याला भारतात नेमणूक दिली. कारण तेव्हा ब्रिटिश राज्याचं अस्तित्व हा आणीबाणीचा मुद्दा बनला होता. सबंध भारतात एक राष्ट्रीय जाणीव घडत चालली होती. मारू किंवा मरू’ ही ईष्र्या लहानथोरांमध्ये जागी झाली होती. असं झालं तर आपण केवळ मूठभर.. आपलं काय होईल.. हे ब्रिटिश राज्यकर्ते पूर्ण ओळखून होते. १८५७ चा उठाव आणि त्यावेळी इंग्रज स्त्रिया-मुले यांना गुदमरून टाकणारी कलकत्त्यातली अंधारकोठडी ते अजून विसरले नव्हते. जनरल डायर यातून कसा मुक्त असणार? तशात एकदा सुटीवर फिरायला म्हणून तो उत्तर भारतात सपत्नीक गेला तेव्हा त्याला स्वत:ला या स्फोटक भविष्याच्या संभाव्य धोक्याची चाहूल इंग्रज व्यक्ती म्हणून अनुभवायला मिळाली. आणि तिची  एक तीव्र प्रतिक्रिया त्याच्या मनात पेट घेऊ लागली होती. आणि अशा पाश्र्वभूमीवर त्याची नेमणूक त्याच्याच शब्दात या घाणेरडय़ा आणि निंद्य’ कामगिरीवर झाली होती.
तेव्हा उत्सवानिमित्त अमृतसरमध्ये असंख्य माणसांची जणू यात्रा जमायची. तेव्हा साहजिकच त्यातल्या बहुसंख्य माणसांसाठी जालियनवाला बाग हे विसाव्याचं ठिकाण होतं. आपले वारकरी आळंदीत हजारोंच्या संख्येत जमतात, त्याप्रमाणे. पण हे वारकरी कधी धारकरी बनतील, हा धसका ब्रिटिश सत्तेच्या आणि डायरच्याही पोटात असला तर नवल काय? डायरनं खूप योजनापूर्वक ही कामगिरी हाताळली असं दिसतं. त्यानं त्याच्याबरोबर नेपाळ, गुरखा अशा पलटणी मुद्दाम मागवून घेतल्या. त्यांना राष्ट्र म्हणून या देशाविषयी कसलेही भावनिक बंध नव्हते. शिवाय ते थेट युद्ध खेळणारे सैनिक होते. एकरकमी माणसे मारणे हा त्यांच्या हातचा मळ होता. किंबहुना, तीच त्यांची मुरलेली सवय होती. पहिले आठ दिवस डायरनं शहरभर कडक संचारबंदी जारी केली. तसे फलक जागोजागी लावले. संचारबंदीच्या घोषणा अखंड रस्त्यावर होतील अशी व्यवस्था केली. स्वत: डायर त्यात सहभागी झाला. मग हा नियम मोडणारा समूह म्हणून त्यानं जालियनवाला बाग हे लक्ष्य केलं. आणि त्यातून तो अमानुष नरसंहार आकाराला आला.
भारतातल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या नजरेतून डायर कसा निसटला कोण जाणे! पण त्याच्या स्वत:च्या देशात मात्र त्याच्याबद्दल सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळीवर निषेधाची प्रचंड लाट उठली. त्याला चौकशीला सामोरं जावं लागलं. त्यातून त्याला निलंबितही करण्यात आलं. त्याच्यावर जवळजवळ सामाजिक बहिष्कारच पडला. डायरचे शेवटचे दिवस पुन्हा खूप एकाकी आणि उपेक्षित गेले. पण ते त्यानं कणखरपणे स्वीकारलं. त्याच्या मनात घडलेल्या प्रसंगाबद्दल अपराधी भावना तीळमात्र नव्हती. मी माझ्यावर सोपवलेलं कर्तव्य एक सैनिक म्हणून चोख पार पाडलं.. या भूमिकेवर तो अखेपर्यंत ठाम होता.
‘Few Good Men’ म्हणून एक फार सुंदर चित्रपट आहे. सैन्यातील दोन कॅडेट्स आपल्याच एका सहकाऱ्याची हत्या करतात. चौकशीत त्यांचं उत्तर वारंवार एकच आहे.. आम्ही फक्त हुकुमाची अंमलबजावणी केली. हुकूम कोणी दिला, हे सांगायला आम्ही बांधील नाही.अंतिम कोर्टात त्यांना तो हुकूम देणारा कर्नल स्वत:हून चौकशीच्या पिंजऱ्यात येतो आणि शिस्तभंगाबद्दल अपराध्याला केलेली ती शिक्षा होती, असे ठामपणे सांगतो- आपली विश्वंच वेगळी आहेत. तुमच्या बुळबुळीत समाजातले निकष तुम्ही आमच्या लष्करी विश्वाला लावू नका. इथली आव्हानं वेगळी, कर्तव्यं वेगळी आणि इथल्या शिक्षाही वेगळ्या.’’
‘वन फ्ल्यू ओव्हर कक्कूज नेस्ट’मधील जगावेगळ्या शहाण्या-वेडय़ा’ची भूमिका अप्रतिम साकारणारा जेक निकोल्सन इथं त्या कर्नलच्या भूमिकेत आहे. त्याचे ते जळजळीत शब्द आणि प्रक्षुब्ध मुद्रा पाहताना मला नकळत तिथे जनरल डायर दिसू लागला.
जालियनवाला बागमधील हत्याकांड या घटनेविषयी एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या तीव्र भावना आजही तशाच अबाधित आहेत आणि पुढेही राहतील. पण तरीही मला एक निखालस सत्य उमगलंय. आकाशाखाली घडणाऱ्या सर्व भल्या व बुऱ्या घटना आणि त्यावरील प्रतिक्रिया या सापेक्षच असतात. प्रतिक्रियांचे अधिकार सर्वस्वी आपलेच; पण तरीही एक मान्य करायला हवं की, कुठल्याही भल्या वा बुऱ्या घटनेला दुसरी एक बाजूही असते. नव्हे- असतेच असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:01 am

Web Title: poet sudhir moghe writes about poems 2
टॅग : Kavita Sakhi,Poet
Next Stories
1 ‘अशोक-चक्रांकिता..’
2 ‘व्यर्थ न हो बलिदान..’
3 .. असले घडून गेले
Just Now!
X