‘लोकरंग’मधील सिंहस्थ आणि कुंभमेळा यांच्याशी संबंधित लेख वाचले. ते वाचून आपण सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात राहतो आहोत असे वाटले. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळ व आत्महत्यांचा क्षणभर विसरच पडला. कुंभमेळ्यावर २५०० कोटी रुपये खर्चा पडले. पण राज्याच्या तिजोरीत तर खडखडाट आहे! मग हे पैसे कुठून येणार? शेवटी ते जनतेच्या खिशातूनच जाणार आहेत. त्यात मंत्री, सरकारी अधिकारी हात धुऊन घेतात, हे न कळायला सामान्य जनता नक्कीच दुधखुळी नाही.
तेव्हा प्रश्न असा पडतो, की यांना दगडातला देव दिसतो, पण माणसांतला देव कधी दिसणार? अशावेळी आठवण येते ती बाबा आमटे यांची. पंचाहत्तर वर्षांपूर्वी त्यांना एका महारोग्यात देव दिसला. मग अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर सगळेच आनंदवनात येऊ लागले. बाबा आणि साधनाताई त्यांनाच देव मानून त्यांची सेवा करू लागले. आज बाबा आमटे यांची तिसरी पिढी आनंदवन, हेमलकसा येथे कार्यरत आहे. तेथे देऊळ नाही. कारण त्यांची धारणा आहे की, देव देवळात नसतो, तो पीडितांत असतो. त्यामुळेच आनंदवनात देऊळ नाही, तरी ते आधुनिक तीर्थस्थळ झाले आहे. दु:खाची बाब एवढीच आहे की, सरकार एवढा प्रचंड खर्च कुंभमेळ्याकरिता करते, पण आनंदवन आणि हेमलकसाला आर्थिक मदत मात्र मिळत नाही. तरीही आम्ही आमचा महाराष्ट्र ‘पुरोगामी’ आहे असं म्हणायचं. कुठं नेऊन ठेवला आहे तुम्ही आमचा महाराष्ट्र?
प्रफुल्लचंद्र आणि शिल्पा पुरंदरे, वर्सोवा.

या केवळ वरवरच्या सुधारणा
‘सिंहस्थातील विकासयोग’ आणि ‘आधुनिक तंत्रयोग’ हे सिंहस्थाशी निगडित लेख वाचले. सिंहस्थामुळे होणारी विकासकामे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या केवळ वरवरच्या सुधारणा होत. सिंहस्थात तर सोडाच, पण इतरही काळात नाशिकच्या गोदावरी घाटावर घाणीचे प्रचंड साम्राज्य असते. याशिवाय त्र्यंबकेश्वरला तर उतरल्याबरोबर ब्राह्मण तुम्हाला घेरून टाकतात. त्यामुळे या तीर्थस्थानांना जाणे नकोसे वाटते. अशा अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणे जरुरीचे आहे. तसे झाल्याशिवाय विकासयोग आणि तंत्रयोग म्हणजे केवळ भकासयोग आणि स्थानिक नेत्यांचे खिसे गरम करण्याची ती एक व्यवस्था ठरेल.
 राजीव मुळ्ये, दादर.

‘मॅग्निफिसंट सेव्हन’वर आधारित ‘शोले’!
‘शोले’च्या चाळिशीनिमित्ताने न्या. नरेंद्र चपळगावकर, मकरंद अनासपुरे यांचे लेख वाचले. चपळगावकर यांच्या लेखात ‘शोले’मध्ये एका इंग्रजी चित्रपटाची थोडीशी ‘उसनवारी’ केल्याचा उल्लेख आहे, तसेच मकरंद अनासपुरे यांनी ‘सेव्हन सामुराय’चा उल्लेख केला आहे. माझ्या आठवणीनुसार, हा चित्रपट ‘मॅग्निफिसंट सेव्हन’, ‘द गुड, द बॅड अँड अग्ली’, ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन् वेस्ट’ या चित्रपटांतील दृश्यांचा ‘फ्रेम टू फ्रेम’ वापर करून बेतलेला आहे.
१९६०-६१ मध्ये पुण्यात हे सर्व चित्रपट तरुणांत प्रिय होते. आम्ही तर ते दोन-चार वेळा पाहिले. नंतर व्हिडीओ आल्यावर कॅसेट्स आणून मुलांच्या सोबतही पाहिले. ‘मॅग्निफिसंट सेव्हन’मधील खेडेगाव जसेच्या तसे ‘शोले’त दाखवले आहे. ‘फ्यू डॉलर्स’मधील मेक्सिकन दरोडेखोर त्याचा तंबाखू खाण्याच्या लकबीसह गब्बरसिंग झाला. ‘वन्स अपॉन’मधील कुटुंबाची सामूहिक कत्तल ठाकूर कुटुंबाच्या हत्याकांडाशी जुळणारी आहे. या चित्रपटाला भारतीय पब्लिकने डोक्यावर का घेतलं? भारतीय प्रेक्षकांचा एकंदरीत बुद्धय़ांक आठ वर्षांच्या मुलाएवढा मानतात, यात त्याचे उत्तर आहे का? सध्याच्या वर्षांनुर्वष चालणाऱ्या रटाळ मालिका व रिअ‍ॅलिटी शोज्मध्ये त्याचे उत्तर आहे का? मकरंद अनासपुरे यांनी ‘शोले’ लहानपणी पाहिला, त्यामुळे ते इतके प्रभावित होणे साहजिक आहे. पण तटस्थ विचार करणाऱ्या न्या. चपळगावकरांचे काय? त्यामुळे या भारून जाऊन केलेल्या ‘कौतुक लेखां’चे अप्रूप ते काय?
– शरद द. जोगळेकर, बोरीवली.

जुन्या आठवणींना उजाळा
दासू वैद्य यांचा ‘बाजार’ हा लेख वाचला. लेख वाचताना तो खूप दिवसांपूर्वीच्या आठवणींत घेऊन गेला. सहज मित्रांसोबत म्हैसमाळला गेलो होतो. परतताना मोबाइल वाजला म्हणून वाटेत थांबलो. बाजूला शेतात बाभळीच्या झाडाखाली एक जोडपे आपल्या लहान मुलाला घेऊन बसले होते. त्या मुलाने आईला विचारले, ‘आई, शेत कसं असतंय गं?’ त्या प्रश्नातील निरागसपणाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या ‘यमक आणि गमक’मधील लेखाने जीवनाचे गमक कळल्यासारखे वाटले.
 भाऊसाहेब साबळे

अंतर्मुख करणारे सदर
‘यमक आणि गमक’ सदर नेहमी अंतर्मुख करायला लावणारे असते. ‘निघून गेला आहे’ हा लेख तर अप्रतिमच. लग्न मोडलेल्या तरुणाप्रमाणेच पाऊस भ्रमिष्टासारखा वागत आहे किंवा निघून जात आहे. त्यामुळे काळ्या शेतात मरून पडलेल्या हिरव्या पांडुरंगाला जीवन देण्यासाठी केवळ सरकारनेच नाही, तर शहरी नागरिकांनीही आपल्या परीने हातभार लावणे गरजेचे झाले आहे. कारण पावसाची सोयरीक मोडण्यास आपण सारेच कारणीभूत आहोत.
मंदार कुलकर्णी, चिंचवड, पुणे.