ठाणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांतील एकूण आठ हजार ४५ मतदान केंद्रांपैकी तब्बल दहा टक्के म्हणजे ८११ केंद्रे विविध निकषांच्या आधारे संवेदनशील ठरविण्यात आली असून सीसीटीव्ही, व्हिडीओ चित्रीकरण तसेच केंद्र शासकीय निरीक्षकांच्या आधारे (मायक्रो ऑब्झव्‍‌र्हर्स) त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.वेळारासू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
एकाच ठिकाणी पाच मतदान केंद्रे असणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २२३ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्याखालोखाल ठाण्यात २२३, कल्याणमध्ये १८१ तर पालघरमध्ये १६९ संवेदनशील मतदार केंद्रे आहेत. जिल्ह्य़ातील ४१८ संवेदनशील मतदार केंद्रांमध्ये व्हिडीओ चित्रीकरण तर ३६० मतदान केंद्रांवर केंद्रीय निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्त, गस्तीपथके
जिल्ह्य़ातील या चारही मतदार संघांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून १५ हजार २४१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यापैकी १२ हजार ३२१ पोलीस जिल्ह्य़ातील तर २ हजार ९२० पोलीस जिल्ह्य़ाबाहेरचे आहेत.

४६ हजार कर्मचारी,
२४ हजार यंत्रे
जिल्ह्य़ातील तब्बल ७२ लाख मतदारांसाठी तब्बल ४६ हजार ६४९ कर्मचारी आणि २४ हजार ७४१ इलेक्ट्रॉनिक यंत्रे आहेत.