विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया आणि भाजपचे नेते गिरिराज सिंग यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी तीव्र टीका केली आहे. या नेत्यांच्या वक्तव्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आपला पक्ष सत्तेवर आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर तेढ निर्माण केल्याबद्दल बंदी घालण्यात येईल, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. आपला पक्ष सत्तेवर आल्यास संघ, भाजप आणि अशा प्रकारच्या सर्व संघटनांवर बंदी घालण्यात येईल. या संघटना तिढा पसरविण्याचे काम करतात, या प्रकारच्या दंगलखोरांना आम्ही भारताबाहेर हाकलून देऊ, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.
गिरिराज हे नेतेच नाहीत, भाजप हा रा. स्व. संघाचा मुखवटा आहे आणि संघ भारतात जातीयवाद आणि हुकूमशाहीचा प्रचार करीत आहे. जेव्हा ते पकडले जातात आणि त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते आपली वक्तव्ये त्वरेने बदलतात आणि झालेल्या चुका सावरण्याचा प्रयत्न करतात, असेही यादव म्हणाले. अशा प्रकारच्या शक्ती सत्तेवर आल्यास भारत आगीच्या विळख्यात सापडेल आणि त्यामध्ये हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन होरपळले जातील, असेही ते म्हणाले.