करोनाचा प्रसार वाढत असून तो रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय योग्य असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. लॉकडाउनचे नियम लोकांनी पाळावेत. बाहेर गर्दी करू नये. गर्दीमुळे करोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे. करोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

“करोनाने जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात ३४ लाख लोक करोनाबाधित झाले आहेत. भारतात करोनाबाधितांची संख्या ३९ हजार इतकी झाली आहे. महाराष्ट्रात १२ हजार ५०० लोकांना करोनाची लगाण झाली आहे. जगात गो कोरोना चा आम्ही नारा दिला. मात्र करोना काही जात नाही. महाराष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाउन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असता,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केला. त्यानंतर १४ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउन केला. आता तिसऱ्यांदा १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. लॉकडाउनमुळेच आपण करोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहून लॉकडाउनचे नियम पाळावे. गर्दी टाळावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची योग्य सुविधा द्यावी. मजुरांना भोजन वाटप करावे. शाळांच्या प्रांगणात मंडप टाकुन त्यांना भोजन देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.