गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक म्हटली कि, ट्रक, ट्रॉलीपासून ते हातगाडीपर्यंतची व्यवस्था केली जाते. पण पुण्यात राहणाऱ्या एका डॉक्टरांनी चक्क खेळण्यातल्या कारमधून गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली होती. पुण्याच्या कुमठेकर रोडवरील घरगुती गणपतीचा हा विसर्जन सोहळा प्रचंड लक्षवेधी ठरला.

कुमठेकर रोडवर राहणाऱ्या डॉ. मिलिंद संपगावकर यांच्या निवासस्थानी अकरा दिवसांच्या गणपतीची स्थापना होते. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी डॉक्टर संपगावकर यांनी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या कारमधून बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली होती. फुलांनी सजवलेली ही कार ते रिमोटने ऑपरेट करत होते.

अत्यंत वेगळया पद्धतीने होणाऱ्या या विसर्जनाविषयी विचारले असता ते म्हणाले कि, सहा महिन्यांपूर्वी आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे गणपती उचलून नेणे शक्य नव्हते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक कारचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी विसर्जनासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कारचा पर्याय निवडला असे त्यांनी सांगितले. विसर्जनाचा हा अत्यंत कमी खर्चिक असा पर्याय असून मुलांसाठी आपण ही कार आधीच खरेदी केली होती असे त्यांनी सांगितले.