परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली गुंडगिरी कॅमेरात कैद झाली. गाड्यांची तोडफोड करुन एका व्यापाऱ्याला मारहाण करणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. “परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दिला. पण, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा यांनी ट्विटरून केली आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफियाराज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही ..

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे..

परळीमध्ये काय घडलं?
शहरातील टॉवर चौक परिसरामध्ये मुंडे समर्थ असणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी एका व्यापाऱ्याला मारहाण केली. मुंडे समर्थकांनी या चौकामधील गाड्यांची केलेली तोडफोड केली तसेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली. हा सर्वप्रकार या परिसरामध्ये बसवलेल्या वेगवगेळ्या सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ परळी आणि बीड परिसरामध्ये व्हायरल झाला आहे. पुण्यातील व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. काठ्या आणि रॉडने देशमुखांवर कराड यांनी हल्ला केला. जखमी झालेल्या देशमुख यांना परळीच्या शसकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. कराड हे मुंडेचे जवळचे कार्यकर्ते समजले जातात.

देशमुख यांना मारहाण करणाऱ्या गणेश कराड आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात संभाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मुंडे यांच्या समर्थकांनी अशाप्रकारे भरचौकात तोडफोड आणि हणामारी केल्याने या प्रकरणाची परळीमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्विटमधून धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
“परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली असून ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना मी बीड पोलिसांना केली आहे. व्यक्तिगत भांडणात कृपया माझे नाव जोडण्याचा प्रयन्त करू नये ही विनंती,” असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.