News Flash

राष्ट्रवादीच्या यात्रेकडे राणा जगजितसिंह यांची पाठ

राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठ फिरवल्याचा संदर्भ घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

राणा जगजितसिंह पाटील

पक्ष सोडण्याच्या चर्चेला बळ

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे सोमवारी जिल्ह्य़ात आगमन झाले. मात्र, या यात्रेकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच पाठ फिरवल्याने ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेला एकप्रकारे बळच मिळाले आहे. राणा पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता बोचरी टीका केली.

राष्ट्रवादीच्या सातबारावर ज्या नेत्यांची नावे कोरली आहेत, तेच जर पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असतील तर पक्षाचे कार्यकत्रे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकतील, अशा सूचक शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता, बोचरी टीका केली.  शिवस्वराज्य यात्रेचे सोमवारी सकाळी वाशी येथे आगमन झाले. यावेळी आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. मंचावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची अनुपस्थिती खटकत होती.

राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठ फिरवल्याचा संदर्भ घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी शिवसेना-भाजपवरही जोरदार टीका केली. लोकांची दिशाभूल करून भाजपने सत्ता मिळवली आहे. देशातील नव्हे जगातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजप आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीकास्र सोडले. तसेच आपण राहुल मोटे यांना हाताच्या फोडाप्रमाणे मागच्या तीन वेळा सांभाळले. त्यामुळे यापुढेही त्यांना सांभाळा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

एकीकडे राहुल मोटे यांच्यासारखा उमेदवार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे. पाच वर्षे आम्ही तुम्हाला सांगत होतो, नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता. जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली. परंतु त्यावेळी तुम्हाला आमचे चुकीचे वाटत होते, मात्र आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. कारखाने, कंपन्या बंद पडले आहेत. दोन कोटी युवकांनी जे इंजिनिअिरग, डॉक्टरेट केलेले आहेत त्यांनी ६४ हजार जागांसाठी अर्ज केले आहेत. ही या देशाला मोदींची देण आहे, असाही आरोपही पाटील यांनी केला.

फलकावरून डॉ. पाटील पिता-पुत्रांचे छायाचित्र गायब

शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांनी लावलेल्या डिजिटल फलकावर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची छायाचित्रे होती. मात्र माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे छायाचित्र वगळलेले दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:37 am

Web Title: rana jagjit singh patil ignore shivswarajya yatra zws 70
Next Stories
1 कायम शब्द वगळूनही अनुदानासाठी पाच वर्षांपासून संघर्ष
2 कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीकडून पूरग्रस्तांचे संसार लावण्यास मदत
3 बंद गोदामांत घातक रसायनांचा साठा
Just Now!
X