करोना रुग्णावर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेल्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा यवतमाळ पोलिसांनी आज(शनिवार) पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज कळंब व यवतमाळ येथे कारवाई करून एक डॉक्टर, औषधी दुकानदारासह एक महिला व एक तरुण अशा चौघांना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून ‘रेमडेसिविर’चे नऊ इंजेक्शन जप्त करण्यात आले.

जिल्ह्यात एकीकडे या इंजेक्शनसाठी मारामार सुरू आहे. मात्र कळंब येथून इंजेक्शनचा काळाबाजर सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकाना मिळाली होती. त्याआधारे अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे ही शोधमोहीम सोपविली. या पथकाने काही दिवस पाळत ठेवून आज प्रथम कळंब व नंतर यवतमाळ येथे सापळा रचून कारवाई केली.

डॉ.अक्षय मोहन तुंडलवार (३४), सावंत अरुण पवार (४०), सौरभ सुधाकर मोगरकर (२७), बिलकीस बानो मोहम्मद इकबाल अंन्सारी (७५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अलिकडेच रेमडेसिविरच्या विक्रीसंदर्भात शासनाने आदेश काढले. मात्र त्यानंतरही कळंब शहरात दुर्वांकुर मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिवीरची दामदुप्पट दराने अवैधरित्या विक्री सुरू होती. याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजता पोलिसांचे पथक कळंबमध्ये धडकले. औषधी दुकानदार सावंत अरुण पवार (४०) याच्या दुकानात ग्राहक बनून प्रवेश केला. त्याला रेमडेसिविरचे तीन इंजेक्शन मागितले असता त्याने १२ हजारप्रमाणे ३६ हजारांची मागणी केली. यावेळी ग्राहकाने होकार दिला. त्यानंतर पवार व डॉ.अक्षय मोहन तुंडलवार (३४) यांनी रेमडेसिविर छत्रपती शिवाजी उड्डाण पुलवर ३६ हजार रुपये घेऊन दिले. सापळा यशस्वी होताच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. रेमडेसिविर कोठून आणले असे विचारले असता डॉ. तुंडलवार याने सौरभ सुधाकर मोगरकर (२७) रा. कळंब याचे नाव सांगितले. त्याच्या घरी जावून एलसीबी पथकाने त्याच्या माध्यमातून तू ज्यांच्याकडून इंजेक्शन आणतो त्यांना कळव व १२ रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे असल्याचे सांग, असा बनाव केला.

यानंतर पोलिसांनी कळंब येथून तिन्ही आरोपीना अटक केली. बनाव केल्यानुसार सौरभने यवतमाळ येथील बिलकीस बानो मोहम्मद इकबाल अंन्सारी (७५) हिच्याकडून ६० हजार रुपये देऊन इंजेक्शन घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा सापळा जाजू चौक, यवतमाळ येथे दुपारी यशस्वी केला. पोलिसांनी बिलकीस बानो या महिलेसही अटक केली. तिची मुलगी नागपूर येथे परिचारिका आहे. तिच्या माध्यमातून या इंजेक्शनचा काळाबाजर सुरू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या कारवाईने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. अमरावती विभागातील ही आतापर्यंतची दुसरी मोठी कारवाई आहे. सर्व आरोपीना अटक करण्यात आली.

या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभर असून नागपूर हे काळाबाजाराचे केंद्र असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, किशोर जुनघरे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, विशाल भगत, विवेक देशमुख यांनी केली.