नांदेड : मागील शतकातील मराठीचे व्यासंगी प्राध्यापक, कवी डॉ. ना. गो. नांदापूरकर यांच्या ‘मायबोलीची कहाणी’ या छोटेखानीच; पण महत्त्वाच्या पुस्तकाची नवी आवृत्ती मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुढाकारातून वाचक-अभ्यासकांना उपलब्ध होत आहे. यानिमित्ताने एक औचित्य साधले जाणार आहे, ते म्हणजे नांदापूरकर यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे !

या नव्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या १२ जुलै रोजी प्रा.डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांच्या हस्ते बीड येथे करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडलाच मसापच्या कार्यकारी मंडळाची सभा होणार आहे. निजामी राजवटीत हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठामध्ये मराठीच्या अध्यापनासोबतच मराठी भाषा विभागाचे प्रमुख राहिलेल्या नांदापूरकर यांची मराठी भाषा आणि मराठी वाङ्मयाच्या प्रांतात एक स्वतंत्र ओळख आहे. विख्यात समीक्षक नरहर कुरुंदकर यांचे ते मामा होते. मराठी भाषा व वाङ्मयाच्या विद्यापीठीय अभ्यासपद्धतीतील मराठवाड्यातील पहिले अभ्यासक तसेच मराठी विषयात ‘विद्यावाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी प्राप्त करणारे मराठवाड्यातील पहिले संशोधक म्हणून नांदापूरकर यांची ख्याती मराठवाड्याबाहेरही पसरली आहे.

मराठी भाषेच्या जन्मापासून ते महाकवी संत तुकारामांपर्यंतचा मराठी भाषेचा व मराठी वाङ्मय लेखनाचा संक्षिप्त इतिहास नांदापूरकर यांनी मायबोलीची कहाणी या पुस्तकाद्वारे अत्यंत रसाळ शैलीत शब्दबद्ध केला होता. त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेशीही निकटचा संबंध होता. त्यामुळेच परिषदेने ‘मायबोलीची कहाणी’ या पुस्तकाचे महत्त्व लक्षात घेऊन या पुस्तकाची नवी आवृत्ती माफक किंमतीत उपलब्ध करून दिली आहे, असे मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील नांदापूर या गावचे रहिवासी असलेल्या नांदापूरकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९०१ सालचा. सन २००१-२००२ दरम्यान हैदराबाद आणि औरंगाबादच्या दोन्ही प्रमुख साहित्य संस्थांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. त्याला आता २४ वर्षे उलटली असून, या महान कवीच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

मागील काळात हैदराबादच्या साहित्य परिषदेने नांदापूरकर यांच्या समग्र साहित्याचे दोन खंड प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहिली. त्याकरिता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भरीव अर्थसाहाय्य केले होते. मराठी भाषेच्या या उपासकाची स्मृती जपण्याचे पहिले पाऊल आता मसापने टाकले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदापूरकर यांची ‘माझी मराठी’ ही कविता मराठवाड्याचे वाङ्मयीन अस्मितागीत मानली जाते. मागील शतकात अनेक समारंभांमध्ये स्वागत गीत म्हणून सादर झालेली ही कविता विस्मृतीत जाते की काय, अशी स्थिती निर्माण झालेली असताना, नांदेडचे प्रख्यात गायक संजय जोशी, ठाणे येथील हेमा उपासनी, त्यांचे बंधू जयंत नेरलकर प्रभृतींनी या मराठी गीताला नव्याने सादर करण्याची जुळवाजुळव सुरू केली असून, नांदापूरकर यांच्या येत्या जयंतीदिनी या गीताचे लोकार्पण व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे.