कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींसह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, शक्तिपीठ रद्द करण्यासाठी उद्या, बुधवारी पांडुरंगास साकडे घालण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली होती.

बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह ४०० जणांवर कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती, राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी द्यावी, याकरिता ४ जुलै रोजी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगास साकडे घालणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.