सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा शहरालगत खिंडवाडीच्या हद्दीत मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने रसायन घेऊन निघालेला टँकर उलटला. त्यामुळे येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वायू गळती झाली. अनेक तास ही वायू गळती सुरू होती. या वायू गळतीमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जेएनपीटी, मुंबई येथून महामार्गावरून रसायनाचा टँकर कोल्हापूरच्या दिशेने रविवारी निघाला होता. तो महामार्गावरील सेवा रस्त्याने जात होता. मात्र चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर चालक घाबरला. टँकरमध्ये रसायन असल्याने अपघातग्रस्त वाहनातून त्याने सुटका करून घेतली. चालकाला बराच वेळ मदत मिळत नव्हती.
सातारा शहर पोलिसांना अपघाताबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सेवा रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळवून तत्काळ उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. रसायनाची गळती होत असल्याने सुरुवातीला काय करावे हे ठरविण्यासाठी वेळ गेला. अखेर क्रेन बोलावून टँकर सरळ करण्याचे ठरले. त्यानुसार क्रेन चालकाने अथक प्रयत्नांनंतर टँकर सरळ केला. तोपर्यंत टँकरमधील केमिकलची मोठ्या प्रमाणात गळती झाली होती. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्वांची कसरत सुरू होती.