राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता आठवडा उलटला आहे, तरी राज्यात अजून सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. १०५ जागांवर विजय मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना धुळ चारणारे अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिवा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन पाटील यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी भाजपाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसंच त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला. दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीदेखील मुक्ताईनगरमध्ये सभा घेत चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.

शिवसेनेला आतापर्यंत ७ अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ ५६ वरून वाढून ६३ झालं आहे. तर दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्याही वाढली आहे. त्यांना ९ अपक्ष आमदारांनी अद्यापपर्यंत पाठिंबा दिला आहे. भाजपाचं संख्याबळ आता १०५ वरून ११४ वर गेलं आहे.

कोणी दिलाय पाठिंबा…

मंजुळा गावित (अपक्ष): साक्री मतदारसंघ (धुळे)
चंद्रकांत पाटील (अपक्ष): मुक्ताईनगर (जळगाव)
बच्चू कडू(प्रहार जनशक्ती पार्टी) : अचलपूर (अमरावती)
राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी): मेळघाट (अमरावती)
आशिष जैस्वाल (अपक्ष): रामटेक (नागपूर)
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष): भंडारा(भंडारा)
शंकरराव गडाख(क्रांतीकारी शेतकरी पक्ष) : नेवासा