Maharashtra Breaking Updates Today, 18 May : राज्यात निवडणुका कधी होणार? याची उत्सुकता असताना त्या पावसाळ्यानंतरच घेण्यासंदर्भात आयोगानं केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना ग्यानवापी मशिदीचा मुद्दा देखील तापू लागला आहे. अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत सर्व महत्त्वाच्या अपडेट…
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात भारतीय नौदलाच्या P8I विमानातून उड्डाण केलं. P8I हे गस्ती विमान आहे. याचा उपयोग समुद्र परिसरात लांबपर्यंत शत्रूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. पाण्यात लपलेल्या पाणबुड्या शोधण्यासाठी आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जातो. सविस्तर बातमी
केंद्र सरकारने बुधवारी राज्य सरकारांना पावसाळ्यात पूर, चक्रीवादळ आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सचिवांच्या वार्षिक परिषदेत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी हे आवाहन केलं आहे. सविस्तर बातमी
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी पेरारिवलन याला सोडवण्यामागे भाजपानेच परिस्थिती तयारी केली असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. सविस्तर बातमी
राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. सविस्तर बातमी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात एक जाहीर सभा घेणार होते. त्याबाबत सभेच्या ठिकाणासाठी चाचपणी केली जात होती. राज ठाकरे स्वत: सभेच्या ठिकाणाबाबत घोषणा करणार होते. पण आज ते मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे सभा लांबणीवर पडली आहे. सविस्तर बातमी
दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे बैजल यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यांनी पाच वर्षे पाच महिने दिल्लीचे उप राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं. सविस्तर बातमी
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घराच्या पाठीमागे खेळायला गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा भयावह अंत झाला आहे. गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सविस्तर बातमी
डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रोड जवळच्या आगरकर रस्त्यावरील एका जवाहिऱ्याच्या दुकानात घुसून एका अज्ञात बुराखाधारी इसमाने दुकान मालकावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएमवर काही चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे चार ते पाच चोरट्यांनी हा दरोडा टाकला आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधून सुमारे १७ लाख २१ हजार ९०० रुपयाची रोकड लंपास केली आहे. सविस्तर बातमी
मागील काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता दिल्लीतील प्रसिद्ध वास्तू कुतुबमिनारबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत. अलीकडेच कुतुबमिनार परिसरात एका हिंदुत्ववादी गटाने आंदोलन केलं होतं. तसेच कुतुबमिनारचं नामकरण ‘विष्णूस्तंभ’ करावं, अशी मागणीही त्या गटाकडून करण्यात आली होती. यानंतर आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एका माजी अधिकाऱ्यानं खळबळजनक दावा केला आहे. सविस्तर बातमी
समाजाच्या व्हॉट्सअॅपग्रुपवरून विवाह जुळवल्यानंतर लग्न ठरलेल्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय आलेच नसल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. यामुळं सुखी संसाराची स्वप्न पाहिलेल्या नववधूची निराशा झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर नववधूच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर बातमी
उषा चव्हाण यांचे पुत्र हृदयनाथ दत्तात्रय कडू (वय ५२, रा. पद्मादर्शन सोसायटी, पुणे-सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. उषा चव्हाण-कडू यांनी जांभळी गावातील जमीन १९९९ मध्ये खरेदी केली होती. १५ मे रोजी जेसीबी यंत्राद्वारे जागेत खोदकाम सुरू असल्याची माहिती कडू यांना मिळाली. त्यानंतर कडू पोलिसांना घेऊन तेथे गेले. तेव्हा त्यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले. चव्हाण यांच्या जमिनीखालून शेती, गुरांसाठी जलवाहिनी टाकण्याची परवानगी शासनाने दिली होती, असे धनकुडे यांनी नमूद केले.
माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. स्वत:ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी मागील जवळपास साडे सहा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालायने शीना बोरा हत्याकांड प्रकरणात त्यांना दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. सविस्तर बातमी
OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाबाबत दिलेल्या निकालाचं महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आलं आहे. तसेच मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रालाही न्याय मिळेल आणि आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, असा विश्वासही महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर बातमी
कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु केली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत असून त्याची तातडूने चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने अटक केली आहे. व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी ही मोठी अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयने रात्री उशिरा कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणला अटक केली. अधिक वाचा…
मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सोबतच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अधिक वाचा…
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुटकेची मागणी करणाऱ्या पेरारिवलन याच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली होती, निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. आज यावर निकाल देतांना पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले, यामुळे तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगा बाहेर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ च्या आधारावर सुटकेचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ तस्करीतील गु्न्ह्यात कल्याण बाजारपेठ पोलिसांना हवा असलेला आरोपी जेठालाल हिमताराम चौधरी याला पोलिसांनी पत्रीपुलाजवळील बाजार समितीच्या परिसरातून शिताफीने अटक केली. दोन वर्षापासून पोलीस जेठालालच्या मागावर होते. गु्न्हा केल्यानंतर आपण जेठालाल आहे हे कोणास ओळखू येऊ नये म्हणून जेठालाल अंधांचा काळा चष्मा लावून फिरत होता. तो जन्मजात एका डोळ्याने अंध आहे, असे पोलिसांनी सांगितले.
भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी वाढत्या महागाई विरोधात निषेध व्यक्त केला. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी आहे असा आरोप करत आज अलका टॉकीज चौकात भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कट रचून गोंधळ घालण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे या वाढत्या महागाई विरोधात निषेध करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात आले. या मूक आंदोलनात वैशाली नागवडे देखील सहभागी झाल्या होत्या.
यंदाच्या अमरनाथ यात्रेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. तसेच, प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात RFID टॅग दिले जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लखनऊमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. मात्र, या ट्विटवरुन फैजाबाद आणि अलाहाबादनंतर लखनऊचेही लवकरच नामांतरण होण्याची चर्चा सुरु आहे.
डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विद्युत सामानाची चोरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांपैकी एका तरूणाचा इमारतीच्या वाहिनीवरून उतरताना पाय घसरून मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.
फ्रान्समध्ये ७५ व्या कान फिल्म महोत्सवास मंगळवारी सुरुवात झाली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्हिडिओद्वारे आश्चर्यचकितपणे महोत्सवास हजेरी लावली. रशियाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची विनंती झेनेन्स्की यांनी चित्रपट सृष्टीला केली आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह १४ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका पावसाळय़ानंतर घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला.