Maharashtra News Today : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; राज्यात दहीहंडीचा उत्साह!

Maharashtra News Updates, 19 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर!

Maharashtra News Today : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; राज्यात दहीहंडीचा उत्साह!
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे

Maharashtra Political Crisis Updates : करोनामुळे जवळपास दोन वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागलेल्या दहीहंडी पथकांसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. कारण कोणत्याही निर्बंधांविना मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. राज्यात सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अजूनच आनंदाची ठरणार आहे. एकीकडे दहीहंडीचा उत्साह असताना दुसरीकडे पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांशी संबंधित व्यावसायिकांच्या दिशेनं ईडीनं आपला मोर्चा वळवला आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

19:46 (IST) 19 Aug 2022
गणेशोत्सवात साताऱ्यातच डॉल्बी का वाजवू देवू नये ? ; खासदार उदयनराजेंचा संतप्त सवाल

गणेशोत्सवात आवाजांच्या भींतींचा (डॉल्बी) दणदणाट होवू द्यायचा नाही असा निर्धार पोलीस प्रशासन करीत असतानाच गणेशोत्सवात डॉल्बी वाजायलाच हवी आणि ती का वाजू नये याचे उत्तर देणारे पत्रकच डॉल्बीला नकार देण्याऱ्यांनी काढावे असा आक्रमक पवित्रा खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. सविस्तर वाचा…

19:10 (IST) 19 Aug 2022
सोलापूर : काय झाडी, काय डोंगार फेम… शहाजीबापूंच्या सांगोल्यात विनायक राऊत घेणार सभा!

राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडत असताना त्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आणि ‘ काय झाडी..काय डोंगार..काय हॉटेल..समदं ओक्केमंदी..’ या अफलातून संवादाने गाजलेले आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या रविवारी शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत हे शहाजीबापू पाटील यांच्या घरच्या मैदानात येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी…

18:59 (IST) 19 Aug 2022
चंद्रपूर : मनपा आयुक्तांना भेटायला युवक कक्षात गेला अन् तेथे स्वत:वरच चाकू हल्ला केला

महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात घुसून एका युवकाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण पवार असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. सविस्तर वाचा…

18:51 (IST) 19 Aug 2022
मढ किनारपट्टीवर दुर्मीळ ‘लॉगहेड’ कासव सापडले ; ऐरोली येथे उपचार सुरू

मढ येथील सिल्व्हर समुद्र किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमारांना दुर्मीळ 'लॉगहेड' कासव दिसून आले. त्यानंतर याठिकाणाहून त्याची सुटका करून ऐरोली येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात दाखल केले. प्राथमिक तपासणीत कासवाला फुप्फुसाचा दाह असल्याने समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा…

17:47 (IST) 19 Aug 2022
शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस! ; कार्याध्यक्षांनी केलेल्या नियुक्तीला अध्यक्षांची स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर जिल्ह्याचा कारभार अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्यात विभागून दिल्याने पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. जिल्हाध्यक्ष बाबा गुज्जर यांनी कार्याध्यक्ष राजू राऊत यांनी केलेल्या नियुत्या अवैध ठरवून त्यास स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघाची जबाबदारी वाटून दिली आहे. सविस्तर वाचा…

17:25 (IST) 19 Aug 2022
मोठ्या लाभाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील गुंतवणुकदारांची ७५ लाखाची फसवणूक

मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करुन डोंबिवलीतील एका खासगी गुंतवणुकदार कंपनीने येथील सात गुंतवणूकदारांकडून पाच लाख ते १० लाखा पर्यंतच्या रकमा स्वीकारल्या. त्यांना दिलेल्या वेळेत वाढीव परतावा नाहीच, पण त्यांची मूळ गुंतवणूक परत न करता त्या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणूक  केली आहे.

सविस्तर वाचा…

17:05 (IST) 19 Aug 2022
Dahi Handi 2022 : ठाण्याला दहीहंडी उत्सवामुळे जत्रेचे रुप; नौपाड्यात दोन गोविंदा पथकांनी लावले नऊ थर!

Dahi Handi 2022 Celebration : ठाणे शहराच्या विविध भागातील प्रमुख चौकांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उभारलेल्या दहीहंड्या, या उत्सवाच्या ठिकाणी डिजेच्या तालावर थिरकरणारे गोविंदा पथके, गोविंदा पथकांचा उंच मानवी मनोरे रचण्याचा थरार आणि रस्त्यांवर निघालेले गोविंदा पथकांचे जथ्ये…असे चित्र दिवसभर होते. करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण आणि उत्सवावरील निर्बंध हटविले असून यामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी आयोजकांसह गोविंदा पथके मोठ्या उत्साहात उत्सव साजरे करताना दिसून आले. नौपाडा भागातील मनसेच्या दहीहंडीत कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावले. गोविंदा पथकांचा हा थराचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने संपुर्ण शहराला जत्रेचे स्वरुप आले होते. वाचा सविस्तर बातमी…

16:34 (IST) 19 Aug 2022
रळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, शहाणपणा शिकवू नये- आशिष शेलार

भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे, असे शेलार म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींना बोलत होते. वाचा सविस्तर

16:33 (IST) 19 Aug 2022
“आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण

मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे सांगितले. तसेच सर्व सविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय. छा-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्यदेखील केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. वाचा सविस्तर

16:17 (IST) 19 Aug 2022
तलाठी गावात आल्याची घोषणा मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून : कृषीमंत्री सत्तार

विविध भागात तलाठ्यांसह इतर अधिकारी- कर्मचारी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व अन्य नुकसानीचे पंचनामे करत आहेत. या तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी, अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. सविस्तर वाचा…

16:02 (IST) 19 Aug 2022
धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना, अंमलबजावणीचे आदेश

धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी तत्कालिन फडणवीस सरकारने लागू केलेल्या विविध २२ योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याच्या आयुक्त, उपायुक्तांना दिले आहे.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 19 Aug 2022
डोंबिवलीत दीड कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त ;  उल्हासनगरच्या दोन तरुणांना अटक

सुंगधित द्रव्य तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली व्हेल माशाची एक कोटी ६० लाख रुपये किमतीची  उलटी पोलिसांच्या विशेष पथकाने डोंबिवलीतून जप्त केली आहे. या उलटीची तस्करी करणाऱ्या दोन जणांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता अटक केली. सविस्तर वाचा…

15:27 (IST) 19 Aug 2022
Dahi Handi 2022 : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान!

Dahi Handi 2022 Celebration: गेल्या दीड ते दोन महिन्यात खूप घडामोडी घडल्या असून त्या दरम्यान आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. हंडी कठीण होती. पण, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातुन आणखी कोण बाहेर पडणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:08 (IST) 19 Aug 2022
मुंबई : कलिना येथील ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्यांवर घरे रिकामी करण्याची टांगती तलवार

कलिना येथील एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर घरे रिकामी करण्याची टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा देऊ शकत नसल्याचे कंपनी आणि केंद्र सरकारने स्पष्ट केल्यावर उच्च न्यायालयाने घरे रिकामी करण्यासाठी कंपनीने बजावलेल्या नोटिशीविरोधातील कर्मचाऱ्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. वाचा सविस्तर बातमी…

14:58 (IST) 19 Aug 2022
MPSC : महत्त्वाची बातमी – राज्यसेवा २०२२ साठी ३४० पदांची भर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२मध्ये ३४० पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा पदांचा त्यात समावेश आहे.  वाचा सविस्तर बातमी…

14:56 (IST) 19 Aug 2022
तामिळनाडूमध्ये आरएसएसची माध्यमांच्या संपादकांशी बंद दाराआड बैठक

आगामी सार्वत्रिक निवडणूक अडीच वर्षांवर येऊन ठेपलेली असताना देशभरातील पक्ष आणि त्यांच्याशी निगडित संस्था निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन आखताना दिसत आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्थादेखील (आरएसएस) सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. आरएसएसने तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच तेथील प्रमुख माध्यमांच्या संपादकांशी बंद दाराआड बैठक घेतली आहे. माध्यमांच्या संपादकांशी बैठक घेण्याची आरएसएच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर

14:48 (IST) 19 Aug 2022
चंद्रपूर : ‘फेसबुक’द्वारे मैत्री, प्रेम अन् दगा…; तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर केले व्हायरल

नागपुरातील तरुणाने घुग्घुसमधील एका तरुणीशी ‘फेसबुक’द्वारे मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली आणि बदनामी करण्याची धमकी दिली. यादरम्यान त्याने तरुणीचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमावर सार्वत्रिकही केली. प्रेमात धोका मिळालेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

14:36 (IST) 19 Aug 2022
पुणे : नैराश्यातून घर सोडलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांकडून शोध ; आत्महत्येपासून परावृत्त करीत मनपरिवर्तन

दुर्धर आजार तसेच आर्थिक नुकसानामुळे नैराश्यातून आयुष्य संपविण्यासाठी घर सोडून गेलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांनी काही तासांत शोध घेतला. आत्महत्येपासून परावृत्त करत या महिलेचे मनपरिवर्तन केले. लष्कर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत. सविस्तर वाचा…

14:28 (IST) 19 Aug 2022
Dahi Handi 2022 : मुंबईत विविध ठिकाणी १२ ‘गोविंदा’ जखमी; रूग्णालयात उपचार सुरू

Dahi Handi 2022 Celebration Mumbai : मुंबईत तब्बल दोन वर्षानंतर दहीहंदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गोविंदा जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

14:24 (IST) 19 Aug 2022
“नशीब गोडसेला तरी फासावर लटकवलं,” ओवेसींची भाजपावर जोरदार टीका

Bilkis Bano case: सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राजकीय नेतेही यावर भाष्य करत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील दोषींची सुटका केल्याने संताप व्यक्त केला असून, भाजपाला लक्ष्य केलं आहे. गुजरात असो अथवा कठुआ, भाजपा नेहमीच बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहते असा आरोप ओवेसींनी केला आहे. ओवेसी यांनी ट्वीट केलं असून नशीब नथुराम गोडसेला तरी फासावर लटकवलं अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी

14:11 (IST) 19 Aug 2022
चंद्रपूर : जखमी वाघाचा चिमुरच्या जंगलात संचार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर वनपरिक्षेत्रात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एक वाघ जखमी अवस्थेत दिसून आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा पट्टेदार जखमी वाघ जंगलात फिरत असून त्याच्या डोळा व कानाजवळ जखम असल्याचे ट्रॅप कॅमेरात आढळून आले आहे. चिमूर लगत खडसंगी व झरी परिसरात हा जखमी वाघ फिरत असल्याचे समजते. वाचा सविस्तर बातमी…

14:06 (IST) 19 Aug 2022
पोलीस असल्याचे भासवून लुटले ; दोघांनी ज्येष्ठ नागरिकाची ४५ हजारांची सोनसाखळी लांबवली

आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्या गळ्यातील जी सोनसाखळी आहे ती  काढून रूमालात ठेवा असे सांगत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला ४५ हजारांना गंडा घातला आहे. अंबरनाथच्या नवरे पार्क परिसरात रस्त्यावर गुरूवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दोनच दिवसांपूर्वी बदलापुरात सकाळी फेरफटका  मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी सोनसाखळी लंपास केली होती. सविस्तर वाचा…

14:00 (IST) 19 Aug 2022
Dahi Handi 2022 : नागपूर – जन्माष्टमीच्या ‘सरकारी’ सुटीचा घोळ; शाळांना सुटी तर महाविद्यालये आणि कार्यालय मात्र सुरू

Dahi Handi 2022 Celebration : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी उत्साहात जन्माष्टमीची सुटी जाहीर केली. पण आदेश काढताना तो फक्त मुंबईसाठी काढला. त्यामुळे घोळ झाला. अनेकांनी आज सुटी आहे असे गृहीत धरले होते. पण ऐनवेळी त्यांना सुटी नाही, असे कळल्याने त्यांची तारांबळ उडाली. वाचा सविस्तर बातमी…

13:49 (IST) 19 Aug 2022
महाविद्यायीन तरुणीचा लैंगिक छळ करणाऱ्या अंबरनाथच्या तरुणाला अटक ; कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई

कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मानसिक, लैंगिक छळ करुन तिचा विनयभंग करणाऱ्या अंबरनाथ मधील चिखलोली भागातील तरुणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी हा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा…

13:43 (IST) 19 Aug 2022
मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र; उपायुक्त संगीता हसनाळे यांची बदली रद्द

राज्यातील सत्तातरांतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिकेतील उपायुक्त संगीता हसनाळे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून परिमंडळ १ च्या उपयुक्त पदी बदली करण्यात आली होती. मात्र पाचच दिवसात त्यांची बदली रद्द करून त्यांना परिमंडळ १ आणि घनकचरा व्यवस्थापन दोन्ही पदांचा कार्यभार देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:33 (IST) 19 Aug 2022
सावधान! बुलढाणा जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; ९ रुग्ण आढळले ;  गंभीर रुग्ण अकोल्यात जीवनरक्षक प्रणालीवर

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरू लागला असतानाच 'स्क्रब टायफस’ या नवीन आजाराने डोके वर काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचे तब्बल ९ रुग्ण आढळले असून एकट्या खामगाव तालुक्यातील ७ रुग्णांचा यात समावेश आहे. यातील एका गंभीर रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहे. सदर रुग्ण जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) असल्याचे सूत्रांनी सांगितले. सविस्तर वाचा…

13:33 (IST) 19 Aug 2022
पुणे : दंड आकारल्याने वाहतूक पोलिसाला चौघांकडून मारहाण; दोघांना अटक

पुण्यातील टिळक चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी चालक महिलेवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाहीतर, आमच्या विरोधात जर तू तक्रार केलीस, तर तुझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार करू, अशी धमकी देखील आरोपी महिलेच्या पतीने दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:20 (IST) 19 Aug 2022
अनैतिक संबंधातून बांधकाम ठेकेदाराचा खून

अनैतिक संबंध आणि कामाच्या पैशावरून बांधकाम ठेकेदाराच्या डोक्यात हातोडीने वार करून एका मजुराने खून केला. ही घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी मजुरास पोलिसांनी शिवनीतून अटक केली. विनोद मडावी (३०, शिवनी-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

12:44 (IST) 19 Aug 2022
गडचिरोली : प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईची मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहेरी येथे उघडकीस आली आहे. निर्मला अत्राम असे मृत महिलेचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:36 (IST) 19 Aug 2022
तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी “लवकरच जनता त्यांना बुटाने मारणार आहे,” असे विधान केले आहे. याधी सुगतो रॉय यांनी जे पक्षाला (तृणमूल काँग्रेस) बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची कातडी सोलून बुट तयार करू, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला उत्तर म्हणून दिलीप घोष यांनी वरील विधान केले आहे. वाचा सविस्तर

12:26 (IST) 19 Aug 2022
नागपूर : राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राला मुहूर्त मिळेना!

राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राचा (रोबोटिक सर्जरी केंद्र) प्रस्ताव वाढीव निधीअभावी हाफकिनकडे रखडला होता. तीन महिन्यांपूर्वी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खनिकर्म महामंडळाकडून ३.८९ कोटींचा अतिरिक्त निधी मिळवून दिला. परंतु, निविदा प्रक्रिया झालेली असतानाही हाफकिनकडून यंत्रमानवाचा खरेदी आदेश निघत नसल्याने प्रकल्प रखडलेलाच आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:15 (IST) 19 Aug 2022
अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ देशातील पहिला सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम राबविणार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यंदापासून सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी फ्रान्स येथील ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’ सोबत सामंजस्य करार केला आहे. या प्रकारचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम असल्याची माहिती कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठातील तज्ज्ञांसह ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’चे विषय तज्ज्ञ सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:14 (IST) 19 Aug 2022
मुंबईत मुलींनी लावली चार थराची दहीहंडी

मुंबईतील दादर परिसरात मुलींनी चार थरांची हंडी लावून गोकुळाष्टमी साजरी केली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

12:00 (IST) 19 Aug 2022
नागपूर : दाभा परिसरात बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद; वनखात्याकडून सतर्कतेचा इशारा

नागपूर आणि बिबट्याचा वावर हे समीकरण आता नागपुरकरांना तसं नवीन नाही, पण तरीही शहरात बिबट्या दिसला तर ते दहशतीत येतात. शहरातील दाभा परिसरात बिबट्याने कायम दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दाभा येथील तुलसी पार्क सेंट्रल शाळेजवळील कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाल्याने वनखात्याने या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री येथे कॅमेरा ट्रॅप लावण्यात येत आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:48 (IST) 19 Aug 2022
राष्ट्रवादीतील पाच नेत्यांची चौकशी करायची आहे, भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. लवकरच त्यांची नावे देशपातळीवर कळवणार आहोत, असे निंबाळकर म्हणाले आहोत. वाचा सविस्तर

11:47 (IST) 19 Aug 2022

सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

11:45 (IST) 19 Aug 2022
राजस्थान दलित विद्यार्थी मृत्यू प्रकरण : ८ रुग्णालयं, १३००० किमीचा प्रवास वाचवण्यासाठी लढा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले असून आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, शिक्षकाने मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मोठे कष्ट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी २५ दिवसांत ८ रुग्णालयं गाठली तसेच आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी या काळात तब्बल १३०० किमी प्रवास केला आहे. वाचा सविस्तर

11:39 (IST) 19 Aug 2022
CBI कारवाईनंतर केजरीवाल संतापले, न्यूयॉर्क टाइम्सचा फोटो केला ट्वीट

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जावर कौतुक होत असल्यानेच कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी टाकलेल्या छाप्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं, आणि यावेळीही होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी

11:16 (IST) 19 Aug 2022
“… आम्ही आता सगळे काही संपवून टाकू” म्हणत, समीर वानखेडेंना ट्वीटरवरून धमकी

अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ट्वीटरवरून धमकी देण्यात आली आहे. याबाबत वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:02 (IST) 19 Aug 2022
पुण्यात फक्त २८८ खड्डे? रस्त्यांची चाळण, पण ९८ टक्के खड्डे दुरुस्तीचा महापालिकेचा दावा

पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होऊनही रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले असतानाच शहरातील ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात ११ हजार ७०६ खड्ड्यांपैकी ११ हजार ४१८ खड्डे बुजविण्यात आले असून शहरात केवळ २८८ खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:00 (IST) 19 Aug 2022
जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कधी करणार? महाराष्ट्र ‘अंनिस’चा शासनाला सवाल

“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले. पण, कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ झाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून नवीन सरकार तरी हे नियम करणार का?” असा सवाल महाराष्ट्र अंनिसमार्फत मुक्ता दाभोलकर आणि डॅा. हमीद दाभोलकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:59 (IST) 19 Aug 2022
ठाणे: कळव्यात संतप्त प्रवाशांनी रोखली एसी लोकल; ट्रॅकवर उतरुन आंदोलन

ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आज आक्रमक होत आंदोलन सुरू केले असून, एसी लोकल रोखल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवासी संतप्त झाले असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:33 (IST) 19 Aug 2022
पत्नी धनश्रीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांवर युजवेंद्र चहलने केलं भाष्य, म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज लावले जात आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेली स्टोरी ठरत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामला आणखी एक स्टोरी शेअर केली असून चर्चांवर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

10:32 (IST) 19 Aug 2022
Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजार जणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

Bilkis Bano case: सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. बिल्किस बानो यांनीदेखील “आपल्यावर अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या ११ दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान, मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह अनेक प्रसिद्ध मंडळींना निवेदन प्रसिद्ध करत दोषींची सुटका रद्द करण्याची मागणी केली. तब्बल सहा हजार जणांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

सविस्तर बातमी

10:22 (IST) 19 Aug 2022
संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ईडी तपासात उघड

पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सविस्तर बातमी

10:15 (IST) 19 Aug 2022
दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा कसा मिळाला?

राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या बक्षीस रकमा, कलावंतांची मांदियाळी यामुळे दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर निर्माण केले होते. यातील साहस व क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन त्याला आता साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.

वाचा सविस्तर

10:14 (IST) 19 Aug 2022
राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह

मुंबई, ठाणे, पुण्यात मानाच्या दहीहंडीसाठी थर लावायला सुरुवात, राजकीय नेतेमंडळींचाही मोठा वावर!

10:13 (IST) 19 Aug 2022
संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार

पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

वाचा सविस्तर

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे

Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

Web Title: Maharashtra news live 19 august 2022 dahi handi news today sanjay raut ed maha political crisis monsoon assembly session

Next Story
Petrol-Diesel Price on 19 August 2022: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर काय?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी