Maharashtra Political Crisis Updates : राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाची राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना दुसरीकडे शिर्डी संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसंना हिंदुह्रदयसम्राट म्हटल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता गणेशोत्सव संपल्यामुळे दसरा मेळावा आणि त्याअनुषंगाने पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात दावे-प्रतिदावे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Updates Today, 13 September 2022: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

21:45 (IST) 13 Sep 2022
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे शाहूमहाराज भोसले (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने  पुणे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या मागे वृषालीराजे भोसले या कन्या आहेत.ते खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे व विक्रमसिंहराजे यांचे चुलते होते. रात्री उशीरा पार्थिव साताऱ्यातील अदालत वाड्यात आणले जाणार आहे.अंत्यसंस्कार बुधवारी होणार आहेत.

सविस्तर वाचा

21:40 (IST) 13 Sep 2022
अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या महिलेस अटक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या महिलेवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. समाजमाध्यमावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस वेगवेगळ्या विषयावर भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टला खूप प्रतिसाद मिळतो. त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या एका पोस्टवर ७ सप्टेंबर रोजी एका महिलेने चार वेगवेगळे प्रतिसाद दिले.

सविस्तर वाचा

21:24 (IST) 13 Sep 2022
आमदार जितेंद्र आव्हाड आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे फेसबुक या समाजमाध्यामावर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

21:02 (IST) 13 Sep 2022
शिक्षिकेचा साडेतीन वर्षीय मुलीवर अभ्यासाच्या नावावर बाल अत्याचार; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

दिलेला अभ्यास नीट करत नाही म्हणून रागाच्या भरात शिकवणी शिक्षिकेने अमानुष पणाचा कहर करीत एका साडेतीन वर्षीय चिमुरडीला  उलतणे गरम करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाल अत्याचार कलमान्वये शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अद्याप अटक करण्यात आले नाही.

सविस्तर वाचा

20:33 (IST) 13 Sep 2022
मंडळांना मंडप, कमानी हटविण्याचे अतिक्रमण विभागाचे आदेश

गणेशोत्सव संपल्यानंतरही मंडळांचे मांडव, रनिंग मंडप, कमानी, रथ रस्त्यावरच असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मंडळांनी तातडीने कमानी, मंडप हटवून रस्ते मोकळे करावेत, असे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिले असून त्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

20:01 (IST) 13 Sep 2022
पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही उचलबांगडी; उपायुक्त स्मिता झगडे यांना बढती

पिंपरी महापालिकेतील वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महापालिकेतील उप आयुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी पालिकेतील यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांचे सर्वात ‘खास’ अधिकारी म्हणून ढाकणे यांची ओळख होती.

सविस्तर वाचा

19:54 (IST) 13 Sep 2022
ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम नोव्हेंबरपर्यंत; तीन तासांचे ३० मेगाब्लाॅक

तब्बल १५४ वर्षे जुना ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील पाडकामाला सुरुवात झाली असून तीन तासांचे तब्बल ३० मेगाब्लाॅक घेऊन काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाचे पाडकाम तीन महिने चालणार असून या कामांत एक २७ तासांचा मोठा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

19:35 (IST) 13 Sep 2022
अधिकार नसतानाही अन्य विभागांकडून अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

अनाथ आरक्षणासाठीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार केवळ महिला आणि बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांना आहेत. मात्र, अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही बेकायदेशरित्या अनाथ प्रमाणपत्र देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्य यंत्रणेकडून वितरित करण्यात आलेली अनाथ प्रमाणपत्रे भरती प्रक्रियेमध्ये स्वीकारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा

19:33 (IST) 13 Sep 2022
विसर्जन मिरवणुकीच्या विलंबाची नैतिक जबाबदारी आमची; मानाच्या गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांची भावना

दोन वर्षानंतर यंदा उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या विलंबाची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत, अशी भावना मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली. त्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या पातळीवर आत्मपरीक्षण सुरू असून पुढील वर्षी चित्र बदललेले असेल, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा

19:17 (IST) 13 Sep 2022
यवतमाळ : ‘गुड्डी’ला कसे काय आणले, असे विचारत आठ जणांनी केले तरुणाचे अपहरण

महागाव तालुक्यातील ब्राह्मी गावातील तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथील आठ जणांनी संगनमत करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या आईने पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

सविस्तर वाचा

19:12 (IST) 13 Sep 2022
नवनीत राणांविरुद्ध अकोल्यातही एल्गार!; राजकीय फायद्यासाठी दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आरोप

दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, अमरावती येथे  नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालून सतत ‘लव्ह जिहाद’ चा उल्लेख केला.

सविस्तर वाचा

18:42 (IST) 13 Sep 2022
स्वारगेट परिसरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा

स्वारगेट परिसरात कालव्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. स्वारगेट परिसरातील कालव्याजवळ एका पत्र्याच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

सविस्तर वाचा

18:20 (IST) 13 Sep 2022
चंद्रपूर : प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचे शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र, समाज माध्यमांवर सार्वत्रिक

शासनाकडून सातत्याने येणाऱ्या नवनवीन आदेशामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. या आदेशांमुळे विद्यार्थ्यांचा मेंदू व शिक्षणाची लय विचलित झाली आहे. प्रशासकीय शिक्षणयंत्रणा शिक्षकांनी काय करावे हे सांगण्यासाठी आहे, की शिक्षक काय करत आहेत, शाळाशाळांतून काय घडत आहे याकडे लक्ष ठेवून शिक्षकांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करणारी असली पाहिजे?

सविस्तर वाचा

18:16 (IST) 13 Sep 2022
पदभरती परीक्षांतील प्राधान्य क्रमवारीच्या निकषांत एमपीएससीकडून बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीबाबतच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. त्यात उमेदवारांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असून, या बदलाची अंमलबजावणी आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल.

सविस्तर वाचा

17:54 (IST) 13 Sep 2022
कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या ‘या’ औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले

छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटीच्या त्रासाला नाहीसे करण्यासाठी झेन्टॅक हे औषध वापरले जाते. अमेरिकेत मात्र या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेनंतर आता भारतानेही या औषधांबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने झेन्टॅक, रॅन्टॅक यांच्यासह एकूण २६ औषधांना अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले आहे. वाचा सविस्तर

17:53 (IST) 13 Sep 2022
हिंदू धर्माविषयी खासदार ए राजा यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे खासदार ए राजा यांनी हिंदू धर्माविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. ए राजा यांनी तुम्ही जोपर्यंत हिंदू होत नाहीत तोपर्यंत तुम्ही शूद्र आहात. जोपर्यंत तुम्ही हिंदू होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही अस्पृश्य आहात असे म्हटले जाते, असे विधान केल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून ए राजा तसेच डीएमके पक्षावर टीका केली जात असून एका समुदायाला खूष ठेवण्यासाठी विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप केला आहे. वाचा सविस्तर

17:53 (IST) 13 Sep 2022
भाजपाचा ‘चलो नबन्ना’ मोर्चा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं; रेल्वेस्थानक परिसरात राडा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून ‘चलो नबन्ना’ मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. याच नबन्ना मोर्चात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमधील भाजपाचे कार्यकर्ते कोलकात्याच्या दिशेने जात आहेत. मात्र येथील राणीगंज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजपाच्या चलो नबन्ना मोर्चाला पोलिसांनी परावनगी नाकारलेली आहे. वाचा सविस्तर

17:52 (IST) 13 Sep 2022
मनसेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई

मुंबईतील मनेसेचे नेते वृशांत वडके यांना बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

17:43 (IST) 13 Sep 2022
ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत चारशेने वाढ; शहरात केवळ १६० खड्डेच शिल्लक असल्याचा पालिकेचा दावा

महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापुर्वी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविले होते. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी रस्त्यावर इतरत्र पसरल्याने त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा

17:36 (IST) 13 Sep 2022
वाहतूक पोलिसाला मारहाण करणारा वाहनचालक अटेकत

मोबाइलमध्ये गाडीचे छायाचित्र टिपल्याच्या रागातून एका वाहनचालकाने वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री मानखुर्द परिसरात घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहनचालकाला अटक केली.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 13 Sep 2022
आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी झोपडपट्टीतील १४ मुलांची निवड; स्पर्धेच्या खर्चासाठी दानशूरांना साद

कझाकिस्थान येथे होणाऱ्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंबूरमधील झोपडपट्टीतील १४ खेळाडूंची निवड झाली आहे. मात्र या खेळाडूंच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असून कझाकिस्थानमध्ये जाण्यासाठी येणाऱ्या मोठ्या खर्चासाठी या खेळाडूंनी दानशूरांना साद घातली आहे.

सविस्तर वाचा

17:24 (IST) 13 Sep 2022
महाराष्ट्रात झालेल्या फसवणुकीचा सत्तांतराने बदला घेतला; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची स्पष्टोक्ती

भाजपाची ताकद प्रत्येक राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचे सरकार आले. गोव्यात देखील भाजपाने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात मात्र आमची फसवणूक झाली. यामुळे भाजपाने या फसवणुकीचा बदला घेऊन महाराष्ट्रात भाजपा युतीचे सरकार आणले. अशी स्पष्टोक्ती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

सविस्तर वाचा

17:12 (IST) 13 Sep 2022
बळीराजावर जलसंकट! तब्बल १६ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात; बुलढाणा जिल्हयातील वेदनादायी चित्र

तीन दिवसांच्या तांडवानंतर पावसाचा जोर आता कमी झाला आहे. मात्र  केवळ तीन दिवसांतच अतिवृष्टीमुळे जिल्हयात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकांचे  नुकसान झाले आहे. यामुळे  बळीराजा हवालदिल झाला आहे.

सविस्तर वाचा

17:03 (IST) 13 Sep 2022
कोला : नदीवरील पूल ओलांडतांना आजोबा व नातू नदीच्या प्रवाहात वाहून गेले

मोहाळी नदीवरील पूल ओलांडत असताना आजोबा आणि नातू दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना अकोट तालुक्यातील तांदूळवाडी-सोनबर्डी पुलावर घडली. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला, तर नातवाचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा

16:59 (IST) 13 Sep 2022
मोदींवर टीका करताच नोकरी गमावली!; भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षकाची हकालपट्टी

शहरात कार्यरत एका पोलीस उपनिरीक्षकाने मागच्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची जणू मोहीमच उघडली होती. पण, कुणीच आक्षेप घेत नसल्याने त्याचे धाडस वाढले व त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. ही टीका त्याला चांगलीच  भोवली असून त्याला थेट निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

16:12 (IST) 13 Sep 2022
अमरावती : खा. नवनीत राणा यांच्‍या विरोधात निवृत्‍त पोलीस आक्रमक

खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली.

सविस्तर वाचा

16:09 (IST) 13 Sep 2022
मुंबई : विस्टाडोम डब्यासह धावणार तेजस एक्स्प्रेस ; कोकण मार्गावर दुसरा विस्टाडोम डबा

वातानुकूलित डबा, आरामदायी आसन, काचेच्या खिडक्या आणि छत यासह वैशिष्ट्यपूर्ण असलेला विस्टाडोम डबा (पारदर्शक डबा) आता सीएसएमटी-करमाळी-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसलाही जोडण्यात येणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम डबा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. त्याचे आरक्षण १४ सप्टेंबरपासून करता येईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर…

16:07 (IST) 13 Sep 2022
मुंबई : कोकणात जाणाऱ्या ‘डबल डेकर’ची ओळख काळाच्या पडद्याआड

सात वर्षांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेसची ‘डबर डेकर’ही ओळख काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या गाडीत वरती आणि खालती बसण्यासाठी केलेल्या विशिष्ठ व्यवस्थेमुळे ही गाडी आकर्षण बनली होती. आता द्वि साप्ताहिक आणि साप्ताहिक अशा चालणाऱ्या दोन डबल डेकरचे विलीनीकरण करण्यात येणार असून त्या ४ नोव्हेंबर २०२२ पासून नव्याने चालविण्यात येणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

15:54 (IST) 13 Sep 2022
रवी राणांचा सीआयडी चौकशीचा दावा खोटा; पोलीस आयुक्‍तांवरील आरोपांचे प्रकरण

वसुली पथकाच्‍या माध्‍यमातून अमरावतीच्‍या पोलीस आयुक्‍तांनी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्‍या अडीच वर्षांत महिन्‍याला ७ कोटी रुपये पोहचवून दिले, असा गंभीर आरोप करताना याची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार असल्‍याच्‍या आमदार रवी राणांच्‍या दाव्‍यावरच आता प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले असून अशा कोणत्‍याही चौकशीचे आदेश नसल्‍याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

15:45 (IST) 13 Sep 2022
कर्ज प्रकरणातील तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; पोलिसांसह तिघांवर गुन्हा

कर्ज प्रकरणात जामीनदार असलेल्याला सातत्याने नोटीस बजावत त्याच्याकडून पैसे उकळून त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 13 Sep 2022
कृषी उपसंचालकांना मिळणार बढती; ८१ जणांकडून मागविला पसंतीचा विभाग

महाराष्ट्र कृषी सेवा गट ‘अ’ मधील कृषी उपसंचालकांच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना अधीक्षक कृषी अधिकारी पदावर बढती मिळणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१-२२ च्या निवड सूचीमधील पात्र अधिकाऱ्यांच्या यादीला मान्यता दिली असून, त्यात ८१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बढतीमुळे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला (स्मार्ट) सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 13 Sep 2022
मुंबई : खुनाच्या खटल्यात बालगुन्हेगाराला प्रमुख आरोपी करून नियमित न्यायालयापुढे हजर केले

बाल न्याय मंडळाची (जेजेबी) दिशाभूल करून खून प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुख्य आरोपी दाखवणाऱ्या दिंडोशी पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने अतिरिक्त पोलीस आयुक्तांना (उत्तर विभाग) दिले. बातमी वाचा सविस्तर…

15:24 (IST) 13 Sep 2022
वर्तुळाकार रस्त्यासाठी भूसंपादनाला सुरुवात

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्यासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील उर्से गावातील अडीच एकर क्षेत्र असलेला जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला असून संबंधित बाधित शेतकऱ्याची मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 13 Sep 2022
स्मार्ट सिटी पाण्यात गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे

शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने स्मार्ट सिटी पाण्यात गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून सोमवारी पाहणी दौरा करण्यात आला. त्याबाबतचा अहवालही संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे. शहराला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोपडून काढले.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 13 Sep 2022
पावसामुळे शहरभर वाहतूक कोंडी; प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद

पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडी झाली. प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहरात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला. मंगळवारी (१३ सप्टेंबर) सकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडली.

सविस्तर वाचा

14:57 (IST) 13 Sep 2022
मोठी बातमी! ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

राज्य सरकारने २५ वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेत समाविष्ट केलेली जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील (दहिसर मोरी भागातील) ती १४ गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे १५ वर्षांपूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. पण त्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अखेर ती १४ गावे मंगळवारी नवी मुंबई पालिकेत अधिकृतरीत्या समावेश करण्यात आली. तसा अध्यादेश नगरविकास विभागाने सोमवारी काढला आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 13 Sep 2022
सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहर पाण्यात

सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या साथीने केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते पाणी साचण्याच्या प्रकाराला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी संगनमताने केलेली नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे, जागोजागी केलेली रस्ते खोदाई आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते या प्रकारामुळेच जोरदार पावसात शहर पावसात जात आहे.

सविस्तर वाचा

14:45 (IST) 13 Sep 2022
विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एप्रिलमध्ये घेतलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकालात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास होणे ही परीक्षा विभागाची चूक असल्याने दुरुस्ती करून पुन्हा निकाल जाहीर करण्याची मागणी नगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील आणि इतर संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे केली.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 13 Sep 2022
महापालिकेच्या १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

महापालिका कर्मचाऱ्यांकडून वेळेचे उल्लंघन होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून सोमवारी १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या. वेळेत कार्यालयात न आल्याने ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

14:38 (IST) 13 Sep 2022
उरण पनवेल मार्गवर खड्ड्यामुळे वाहतूक मंदावली

उरण : सोमवार पासून सुरू झालेल्या पावसामुळे उरण पनवेल मार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहती जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मंगळवारी या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे उरण वरून जाणाऱ्या व उरण मध्ये येणाऱ्या वाहनांची कोंडी होत असल्याने प्रवाशांनाही त्रास सहन करावे लागत आहे. बातमी वाचा सविस्तर…

14:37 (IST) 13 Sep 2022
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांना फेसबुकवरुन शिवीगाळ करणाऱ्या महिलेला ठाण्यातून अटक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करत, अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. सायबर पोलिसांनी ठाण्यातून महिलेला अटक केली आहे.

सविस्तर बातमी

14:27 (IST) 13 Sep 2022
खडकवासला, पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरलेली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात आणि येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे. परिणामी तरी येत्या दोन तासांमध्ये नदीपात्रामध्ये विसर्ग वाढविण्यात येण्याची दाट शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली.

सविस्तर वाचा

14:18 (IST) 13 Sep 2022
पनवेल : पाचशे जणांचे प्राण वाचविणाऱ्या त्या’ पाच देवदूतांना पनवेलकरांचा सलाम

पनवेलमधील गणेश विसर्जनादरम्यान नूकतीच 11 जणांना विजेचा झटका लागला होता. या घटनेवेळी प्रसंगवधान ठेऊन या ठिकाणी कर्तव्यदक्षपणे राज्य राखीव पोलीस दलाचे (एस. आर. पी. एफ.) तीन जवान आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे दलाच्या दोन अधिकारी यांनी वेळीच जनरेटरमधून सूरु असलेल्या विजप्रवाह वाहिनी बाजूला केल्याने या ठिकाणी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी उभी असलेली पाचशे जण विजझटक्यापासून वाचू शकले. बातमी वाचा सविस्तर…

13:47 (IST) 13 Sep 2022
पुणे : बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

पुणे शहरात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला . बातमी वाचा सविस्तर…

13:19 (IST) 13 Sep 2022
Sada Sarvankar: शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त

दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या संघर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेलं पिस्तूल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी

13:18 (IST) 13 Sep 2022
Arvind Kejriwal Gujarat: “तुम्हाला लाज वाटते का?,” रिक्षाचालकाच्या घरी जेवायला जाताना अडवल्याने केजरीवाल संतापले

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. पण अरविंद केजरीवाल रिक्षाचालकाच्या घरी जात असताना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रोखल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. अहमदाबादमधील रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ अशा शब्दात सुनावलं.

सविस्तर बातमी

13:17 (IST) 13 Sep 2022
Hyderabad Fire: हैदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुममुळे अग्नितांडव

हैदराबादमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठजणांचा मृत्यू झाला असून, काहीजण जखमी आहेत. सोमवारी रात्री सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुममध्ये ही आग लागली. ही आग नंतर वरच्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये पोहोचली आणि इमारतीमध्ये पसरली.

सविस्तर बातमी

13:16 (IST) 13 Sep 2022
IRS Officer Gets Jail: १५ हजारांची लाच घेणाऱ्या IRS अधिकाऱ्याला कोर्टाने तब्बल २३ वर्षांनी सुनावली शिक्षा

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे न्यायालयाने १५ हजारांची लाच घेणाऱ्या आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकाऱ्याला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अधिकाऱ्याने २३ वर्षांपूर्वी ही लाच घेतली होती. न्यायालयाने अधिकाऱ्याला दीड लाखांचा दंहडी ठोठावला आहे.

सविस्तर बातमी

13:06 (IST) 13 Sep 2022
शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणतात…

सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांचा १० सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

वाचा सविस्तर

13:05 (IST) 13 Sep 2022
“पितृपक्षामुळे अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही”, अजित पवारांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले…

“राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे,” अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

वाचा सविस्तर

मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट

 

Maharashtra News Updates Today, 13 September 2022: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!