नांदेड : येत्या मंगळवारपासून नांदेडहून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या विस्तारित सेवेची संपूर्ण तयारी झाली असून, येथून सुटणाऱ्या पहिल्या गाडीचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. या रेल्वेगाडीच्या विस्ताराची सारी तयारी नांदेड रेल्वे स्थानकावर सुरू आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जालना ते मुंबई आणि मुंबई ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारतचा नांदेडपर्यंत विस्तार करण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर सत्ताधारी भाजपामध्ये त्यावरून श्रेयवाद बघायला मिळाला होता; पण तेव्हापासून या रेल्वेगाडीच्या विस्तारित सेवेच्या शुभारंभाकडे लक्ष ठेऊन असलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा मंगळवारी संपणार आहे. ही सुसज्ज, सुसाट, आरामदायी आणि आकर्षक रेल्वे नांदेड-मुंबई दरम्यानचे ६१० कि.मी. अंतर ९ तास २५ मिनिटांत पार करणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने रविवारी जाहीर केले. चेअरकार १८ आणि एक्झिक्युटिव्ह २ अशा २० डब्यांच्या या गाडीत १ हजार ४४० आसनांची व्यवस्था आहे.
मंगळवारी शुभारंभ झाल्यानंतर गुरुवारपासून ही रेल्वेगाडी दररोज सकाळी ५ वाजता एच.एस. नांदेड रेल्वेस्थानकावरून सुटणार असून दुपारी २.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचणार आहे. या गाडीमुळे नांदेड ते छ. संभाजीनगर हा प्रवास अवघ्या सव्वातीन तासांत होईल, तर नाशिक रोड येथे जाण्यासाठी केवळ सहा तास लागणार आहे.
पहिल्या दिवशी ११.२० ला सुटणार
‘वंदे भारत’च्या विस्तारित सेवेच्या शुभारंभदिनी म्हणजे २६ ऑगस्ट रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून ही गाडी सकाळी ११.२० मिनिटांनी सुटणार आहे. आपल्या नियोजित मार्गावरून ही गाडी रात्री ९.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. बुधवार हा रेल्वेगाडीचा विश्रांतीचा दिवस आहे. शुभारंभानंतर २८ ऑगस्टपासून ही रेल्वे आठवड्यातील ६ दिवस धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येथे सांगितले. शुभारंभदिनी पत्रकारांना या रेल्वेची सफर घडवली जाणार आहे. पण रेल्वेने मनमाडपर्यंत प्रवास करणाऱ्यांचीच परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे.